पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा सामाजिक हेडलाइन

‘उद्या येणार सत्ययुग’,ही श्रध्दा आंधळी, आई-बापानेच दिला दोन लेकींचा बळी.

खेड्यातील अडाणी माणसांमध्ये एक म्हण आहे, ‘शिकलेले ते भकलेले’. जास्त शिक्षण, पदवी, भक्कम आर्थिक परिस्थिती, समाजात प्रतिष्ठा असणे शहाणपणा हे साङ्ग चुकीचे आहे. काही वेळा तर सुशिक्षित, सधन लोक अंधविश्‍वासाच्या जाळ्यात सापडल्याचे चित्र समाजात दिसते, तेंव्हा विवेकी माणूस हतबल होऊन हे पहातो. याला कारण अज्ञानी माणसाला समजावता येते, मॉडर्न लोकांना काय बोलणार? आंध्रप्रदेशाातील एका अत्यंत सुशिक्षित आई-वडीलांनी पोटच्या दोन मुलींना केवळ अंधविश्‍वासातून बळी दिल्याच्या घटनेने समाजमनाचा थरकाप उडाला. हे दोघे समाज घडवणार्‍या म्हणजे शिक्षकी पेशातील आहेत, हे जास्तच चिंताजनक आहे. शिक्षक असलेल्या या दोघांनी मुलींनाही उच्च शिक्षण दिले आहे. त्यांच्याकडे एक उच्चशिक्षित उच्चभ्रू परिवार म्हणून पाहिले जात होते, पण त्यांनीच दोन्ही मुलींचा बळी दिला. ‘रविवारी कलीयुग संपणार आणि सोमवारी सत्ययुग सुरू होणार, सत्ययुगात मुली पुन्हा जिवंत होणार’ असे ते सांगू लागले. ते दोघेही रविवारी स्वत:चाही बळी देणार होते. अंधविश्‍वासाचे अत्यंत विदारक रूप समाजासमोर आल्याने खळबळ माजली आहे.

०००

आंध्रप्रदेश राज्याच्या दक्षिणेला चित्तूर जिल्हा आहे. तामिळनाडू, कर्नाटक आणि बंगालची खाडी अशा तीन बाजू असणारा हा जिल्हा. यातील चित्तूर शहर चांगलेच विस्तारले आहे. या शहरात व्ही. पुरूषोत्तम नायडू आणि त्यांचा परिवार रहातो. नायडू हे मदनपल्लीत सरकारी महिला पदवी महाविद्यालयात असोसिएट प्रोङ्गेसर आहेत, तर त्यांची पत्नी पद्मजा पोस्ट ग्रॅज्यूएट आणि सुवर्ण पदक विजेती आहे. ती एका हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. तो प्राध्यापक तर ती मुख्याध्यापक अर्थात दोघेही शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांना समाजात मानसन्मान आहे, कारण ते शिक्षण देतात अर्थात पुढची पिढी घडवतात. त्यांना भरपूर पगार देणे हे तर सरकारचे कर्तव्यच आहे. सरकारने हे कर्तव्य उत्तम तर्‍हेने पार पाडले आहे, शिक्षकांना चांगले पगार दिले आहेत. या परिवारात दोघेही चांगल्या पदावर काम करत असल्याने आर्थिक सुबत्ताही होती. त्यांना दोन मुली होत्या. मोठी मुलगी एलिकख्या आता २७ वर्षाची आहे. ती भोपाळमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे, तर लहान मुलगी साईदिव्या २२ वर्षाची असून तिने बीबीएचे शिक्षण घेतले आहे. ती मुंबईतील ए.आर. रहमान म्युझिक स्कूलची विद्यार्थीनी असून ती नोकरी करत होती. सारेच अभिमान वाटावे असे होते. आरामदायी जीवनशैली होती. सुख दारात हात जोडून उभे होते.

बहुतेकदा परिस्थितीने गांजलेले गरीब लोक बुवाबाजीच्या नादी लागतात असे मानले जाते, पण प्रत्यक्षात सुशिक्षित, सधन लोकांकडून भक्तीचे अवडंबर माजवले जाते, हेच लोक भावनेच्या नावाखाली अनेक ङ्गालतू गोष्टींना महत्त्व देत असतात. अशामुळेच समाजात अनेक बाबा, महाराज, माता, स्वामी यांचा सुळसुळाट झाला आहे. कर्म हाच धर्म असल्याचे अनेक साधु-संतांनी सांगितले असले तरी भोंदूंच्या अमिषाला लोक भुलत असतात, पण सुशिक्षित लोक याला भक्ती, अध्यात्म म्हणतात. तर नायडू दाम्पत्यालाही आध्यात्मिक ओढ होती. तेही काही बाबांचे भक्त होते. त्यांच्या घरात त्या बाबांच्या तस्वीरी लावल्या होत्या. ते नियमित त्यांची पूजा करत, कर्मकांडे करत.

गेले वर्षभर कोरोनाने जगभर थैमान घातले. सार्‍या जगाला जणू कुलूप लागले. सगळे लोक घरातच बंदीवान झाल्यासारखी स्थिती झाली. या लॉकडाऊनच्या काळात नायडू यांच्या दोन्ही मुली घरी आल्या होत्या. कारण शाळा, महाविद्यालये, कार्यालये सारेच बंद झाले होते. साहजिकच हा चौकोनी परिवार दिवस-रात्र घरात एकत्रच रहात होता. बसून-बसून त्यांचा वेळ जात नव्हता. बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे मुली अभ्यास करत, छंद जोपासत वेळ घालवत होत्या. तर नायडू पती-पत्नी धार्मिक कार्यात मग्न होते. ते पोथ्यापुराने वाचत होते. यातही ते मानत असलेल्या बाबांनी उपदेश केलेली पुस्तके वाचत होते. लॉकडाऊननंतर नायडू दाम्पत्याच्या वागण्यात ङ्गरक पडला होता असे शेजारी-पाजारी सांगतात. त्यांची नजरच अस्थिर झाली होती. ते अस्वस्थ दिसत होते. काहीतरी विचार करत असल्यासारखे ते दिसू लागले होते. आजूबाजूचे कोणी दिसले तरी ते कोणाकडे बघत नव्हते. ते आपल्याच नादात असल्यासारखे वागत असल्याचे शेजारी सांगतात. त्यांच्या वागण्यात बदल झाला होता, ते विचित्र वागत होते हे निश्‍चित.

रविवार दि. २४ जानेवारी रोजी त्यांच्या बंद बंगल्यात काहीतरी सुरू होते. ते नेहमीप्रमाणे पुजा-अर्चा करत असतील असे शेजार्‍यांना वाटत होते, पण रात्रीच्या सुमारास त्या बंद बंगल्यातून आरडाओरडा, किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. या आवाजाने शेजारी-पाजारी बाहेर येऊन पाहू लागले, पण नायडू यांचे दार बंद होते. खिडक्या, बाहेरील गेट पूर्ण बंद असल्याने आतील काहीच दिसत नव्हते, कळत नव्हते. काही वेळाने आवाज थांबला. आता काय झाले असेल या भीतीपोटी लोकांनी पोलीस ठाण्याला खबर दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोवर त्या बंगल्यासमोर बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी गेट उघडून पोर्चमध्ये प्रवेश केला, तेंव्हा प्रो. नायडू बाहेर आले. त्यांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना न जुमानता घरात प्रवेश केला. आतील दृश्य पाहून पोलीसही हादरले. पूजाघरात एका मुलीचा मृतदेह होता. तिचे मुंडण केले होते आणि मृतदेह लाल कपड्यात गुंडाळून ठेवला होता, तर दुसर्‍या मुलीचा मृतदेह तिच्या खोलीत होता. तोही लाल कपड्यात गुंडाळला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा घटनाक्रम असा झाला होता. नायडू दाम्पत्याचा असा विश्‍वास होता की कलीयुगाचा अंत जवळ आला आहे. आता सत्ययुग येणार आहे. कोरोना व्हायरस हा चीनमधून पसरलेला व्हायरस नाही, तर भगवान शिवच्या केसातून निर्माण झाला आहे. आता रविवारी म्हणजे दि. २४ रोजी कलीयुग संपेल आणि सोमवार दि. २५ जानेवारीपासून सत्ययुगास सुरूवात होईल, त्यामुळे कलीयुगात मृत्यू पत्करून पुन्हा दुसर्‍या दिवशी सत्ययुगात जिवंत होता येते, त्यासाठी विधी करावा लागणार होता. हा विधी पद्मजा स्वत: करणार होती. तिला प्रो. नायडू मदत करण्यास सज्ज होते, त्यानुसार त्यांनी आधी लहान मुलीला खोलीत नेले तर मोठ्या मुलीला पूजाघरात पूजेसाठी बसवले. लहान मुलीची पूजा करून तिला तिच्या आईनेच त्रिशुलाने भोकसण्यास सुरूवात केली. या कलीयुगातून तुला मुक्ती देत आहे असे म्हणत त्या जन्मदात्या मातेनेच मुलीला त्रिशुलाने भोकसून ठार केले. ती जीव वाचवण्यासाठी किंकाळ्या ङ्गोडत होती, पण कोणीही तिच्या मदतीला आले नाही. तिचे जन्मदाते आई-वडीलच तिला मृत्यू देत होते. ती ठार झाल्यानंतर त्यांनी तिला लाल कपड्यात गुंडाळून ठेवले. त्यानंतर पद्मजा पूजाघरात आली. तिचा अवतार पाहून तिची मोठी मुलगी घाबरली. आपली आई काहीतरी विपरित करत आहे हे तिच्या लक्षात आले. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा पद्मजाने पूजेसाठी वापरला जाणारा तांब्याचा कलश तिच्या तोंडात घुसवला, त्यासाठी तिला तिच्या नवर्‍याने मदत केली. आई-बापानेच मुलीच्या तोंडात तांब्या कोंबून आवाज बंद केला. त्यानंतर मुलीला खाली बसवून आईने व्यायाम करण्याच्या डंबेल्सने तिच्या डोक्यावर जोरदार ङ्गटके मारण्यास सुरूवात केली. या तडाख्याने ती मुलगी वेदनेने तडङ्गडत होती, पण तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. काही वेळातच ती ठार झाली. त्यानंतर तिच्या आई-वडीलांनी तिलाही लाल कपड्यात गुंडाळून ठेवले.

त्यानंतर ते दोघे आत्महत्या करण्याच्या तयारीला लागले. इतक्यात पोलीस तिथे आले. त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. तेंव्हा ते पोलिसांना म्हणाले, ‘आमचा धार्मिक विधी सुरू आहे. त्यात तुम्ही हस्तक्षेप केल्यामुळे विघ्न आले आहे. आजचा एक दिवस थांबा. कलीयुग संपणार आहे, उद्या सकाळी सत्ययुग सुरू होईल आणि आमच्या मुली पुन्हा जिवंत होतील.’ मात्र या भाकडकथा ऐकायला पोलीस तयार नव्हते. पोलिसांनी कायद्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पंचनामा वगैरे सगळे सोपस्कार पार पाडले. एका सुशिक्षित परिवाराची अंधश्रध्देतून झालेली ही वाताहत धक्कादायकच आहे. या प्रकरणात आणखी काय-काय लपले आहे याचा शोध सध्या पोलीस करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!