पोलीस टाइम्स
उस्मानाबाद औरंगाबाद गडचिरोली जळगाव धुळे नंदूरबार नागपूर नाशिक पुणे महाराष्ट्र मुंबई उपनगर रायगड हेडलाइन

अकिरामने जमिनीचा विषय काढला! सीतारामने त्यास जमिनीवरच पाडला!

धुळे

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात गधडदेव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत धनवाडी पाडा या गावात सिताराम पावरा आणि त्याचा लहान भाऊ अकिराम हे दोन भाऊ आपल्या कुटुंबीयांसमवेत रहातात. आदिवासी समाजातील या पावरा कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी शासनाने धनवडी पाडा परिसरातील वनपट्टे शेतीसाठी दिले आहेत. सिताराम आणि अकिराम यांचे वडील हयात होते तोपर्यंत ते स्वतः या शेतीची मशागत करत असत.  त्यांच्या मृत्यूनंतर सिताराम पावरा हा मोठा भाऊ म्हणून वनजमिनीची देखभाल आणि मशागत करू लागला, तर लहान भाऊ अकिराम हा आपल्या पत्नीसमवेत विटा थापण्याचे काम करू लागला. अकिरामला या कामासाठी बाहेर गावी जावे लागत असे, महिनो न महिने तो बाहेरगावीच असे, त्यामुळे साहजिकच वडीलोपार्जीत जमीन कसण्याचे काम सिताराम करत असे. त्यातून मिळणारे उत्पन्नही तोच घेत असे.

अकिरामचा कुटुंबकबिला मोठा होता. त्विटा थापण्याच्या मजुरीत त्याचा घरखर्च भागेनासा झाला, तेंव्हा त्याची बायको सारबाईने अकिरामला सांगितले की आपणही आपल्या शेतजमिनीचा वाटा घेवून शेती कसूया, तशी मागणी सितारामकडे करूया. त्यानुसार अकिरामने सितारामकडे शेतीची वाटणी मागितली. ही गोष्ट सितारामला खटकली. सुरूवातीला त्याने या गोष्टीकडे कानाडोळा केला. नंतर त्याने नावालाच वाटणी केली, पण शासनदफ्तरी अकिरामचे नाव लावायला सिताराम टाळाटाळ करू लागला.

आपल्या वाट्याची जमीन नावावर करायला सिताराम टाळतोय म्हटल्यावर अकिराम अस्वस्थ झाला. अकिरामने एक-दोन वेळा सितारामला कडक शब्दात समज दिली, तरीही सिताराम प्रत्यक्षात अकिरामच्या नावावर त्याच्या हिश्श्याची जमीन करून देत नव्हता.

परिणामतः दोघा भावांचे संबंध ताणले गेले. दोघांमध्ये वाद होवू लागले. दरम्यान काही महिन्यापूर्वी अकिरामला धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील म्हळसर गावात विटा थापण्याच्या कामाचे कंत्राट मिळाले, त्यामुळे अकिराम गेल्या काही महिन्यापासून सहकुटुंब म्हळसर गावी वास्तव्याला होता.

मंगळवार दि. 29 जानेवारी 2019 रोजी अकिराम आपल्या कुुटुंबासह आपल्या धनवाडीपाडा येथील घरी आला. तेेथे  अकिरामने आपला सितारामला दोन वेळा निरोप पाठवला, परंतु सितारामकडून एकही निरोप आला नाही, म्हणून शेवटी शुक्रवारी म्हणजे दि. 1 फेब्रुवारी 2019 रोजी अकिराम आपला 12 वर्षाचा मुलगा चेतनसह सितारामच्या घरी गेले. यावेळी सितारामने अकिरामला अपमानास्पद वागणूक दिली, त्यामुळे अकिराम उद्विग्न झाला.

सितारामच्या अपमानास्पद वागणुकीने अकिरामही संतापला आणि त्यानेही सितारामला खडे बोल सुनावले. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्याचे रूपांतर भांडणात झाले. दोन भावातले भांडण पाहून, अकिरामचा मुलगा चेतन घाबरला. तो आपल्या घरी गेला व आपल्या आईला त्याने घडलेली हकीकत सांगितली.

दोघा भावांमध्ये कडाक्याचे भांडण होत असल्याचे ऐकून सारबाईने तडक सितारामचे घर गाठले. तिच्यासोबत तिचा मुलगा चेतनही होता. सितारामच्या घरी सारबाई पोहोचली, तेंव्हा दोघा भावांमध्ये कडाक्याचे भांडण चालू होते. सारबाईने समजुतीच्या सुरात दोघांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच सितारामला संताप अनावर झाला. तू येथे का आली? चालती हो. नाही तर तुझ्यासह तुझ्या मुलाचा मुडदा पाडीन असा सज्जड दम दिला.

सितारामचा तो रूद्रावतार पाहून साराबाई आणि तिचा मुलगा चेतन यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला आणि ते दोघे नजिकच्या एका झाडाआड लपून बसले. यावेळी सितारामने घरातील कुर्‍हाड आणून अकिरामला, आल्या वाटेने परत फिर अन्यथा प्राणाला मुकशील असा दम भरला. ‘असे दम देणारे मी भरपूर पाहिलेत.’ असे म्हणून अकिरामने सितारामला हिणवले. त्याचा सितारामला राग आला. त्याने हातातील लोखंडी कुर्‍हाड अकिरामच्या डोक्यात घातली.

सितारामच्या हातातील लोखंडी कुर्‍हाडीचा दणका अकिरामच्या डोक्यात बसताच त्या दणक्याने अकिरामचे डोके फुटले व त्यातून रक्ताच्या धारा सुरू झाल्या. त्याबरोबर अकिराम जमिनीवर धाडकन कोसळला.

झाडाआड लपून हे सारे सारबाई आणि तिचा मुलगा चेतन उघड्या डोळ्यांनी पहात होते. आपल्या डोळ्यादेखत डोक्यात लोखंडी कुर्‍हाड घातली तरी सारबाई किंवा तिचा मुलगा चेतन काही बोलू शकले नाहीत. सितारामने हातातील कुर्‍हाडीने अकिरामच्या डोक्यात घाव घातल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात अकिराम जमिनीवर कोसळला. त्याची सितारामला दया आली नाही. त्याने हातातील कुर्‍हाडीने पुन्हा अकिरामच्या छातीवर कुर्‍हाडीचा घाव घातला.

क्रूरतेची सीमा पार करणारा सिताराम एवढे करून थांबला नाही. त्याने घरातून डिझेलचा डबा आणला आणि तो अकिरामच्या रक्ताळलेल्या देहावर रिता केला आणि आग लावली. यानंतर सारबाईने घडलेली सर्व हकीकत सरपंच जयसिंग जमाल यांना सांगितली. त्यांनी तात्काळ सांगवी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला.

गधडदेव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच जयसिंग जमाल यांनी स्वतः सांगवी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली, त्यानुसार सिताराम पावरा याच्याविरोधात भा.दं.वि. 302, 201 नुसार गुन्हा दाखल झाला.

दरम्यान परिसरातील गावातील एका झोपडीत सिताराम लपून बसला होता. त्याला शोधून ताब्यात घेण्यात आले. नंतर न्यायालयासमोर उभे करून पोलीस कस्टडी घेण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!