पोलीस टाइम्स
अकोला आवश्य-वाचा महाराष्ट्र विदर्भ सामाजिक हेडलाइन

बायको राहते ‘दौला बरोबर, हतबल प्रशांत, संपवले संगिताला, किती दिवस राहणार शांत?

बायकोचे विवाहपूर्व प्रेमसंबंध होते. विवाहानंतरही ते कायम राहिले. ती प्रियकराच्या इतकी अधीन होती, की नवर्‍याला सोडून दोन मुलांना घेऊन प्रियकराबरोबर राहू लागली. या प्रकाराने खचलेला तिचा पती सात वर्ष अस्वस्थ, निराशेच्या गर्तेत कसेतरी दिवस ढकलत होता. मुलांशी असलेला संपर्क यावरच त्याचा जीव जगला होता. पण त्याची आणि मुलाची भेट झाल्यानंतर तिने जो दंगा केला, त्याने त्याच्या संयमाचा अंत झाला. त्याच्या अविचारी क्रोधात तिचा अंत झाला. संसाराला लागलेल्या व्यभिचाराच्या किडीने आयुष्य कशी संपून जातात याचीच दुर्दैवी कथा ही घटना दाखवते.

००००

अकोला येथील अकोला-अकोट रोडवर असलेल्या एकतानगर येथे पांडुरंग इंगळे यांचा परिवार रहातो. पांडुरंग इंगळे हे आपले आयुष्य देशसेवेसाठी खर्ची केल्यानंतर सेवानिवृत्त झाले. सध्या ते कुटुंबासमवेत राहू लागले. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुला-मुलींचे लग्न झाल्यानंतर वृद्ध पती-पत्नी एकतानगर येथील घरी रहात होते. मोठा मुलगा प्रशांत पांडुरंग इंगळे याचा विवाह संगीता नामक मुलीसोबत १८ वर्षाआधी झाला होता. संगीता ही याच परिसरातील अण्णाभाऊ साठे नगर येथे वास्तव्यास होती. लग्नाच्या आधीपासूनच तिचा मित्र परिवार खूप मोठा होता. या भागात रहाणार्‍या दौला नामक मुस्लिम तरूणासोबत तिची जुनी ओळख होती. संगीताचा विवाह झाल्यानंतर ती सासरी पतीकडे रहायला आली. प्रशांत आणि संगीता यांना दोन अपत्य आहेत. यापैकी मानव उर्फ सोनू आणि विनायक अशी यांची नावे आहेत. मानव १७ वर्षाचा तर विनायक १५ वर्षाचा आहे. लग्नानंतर संगीताचे माहेरी जाणे-येणे सुरू असल्यामुळे ती जुन्या लोकांच्या संपर्कात होती. त्यातूनच तिचा पहिला प्रियकरही तिला भेटला.

गेल्या सात वर्षापासून ती पतीपासून विभक्त झाली. कोणताही कायदेशीर घटस्फोट न घेता ती आपल्या मुलांसह अण्णाभाऊ साठेनगर येथे दौला या मुस्लिम तरूणासोबत सोबत राहू लागली. आपली पत्नी विनाकारण आपल्याला सोडून गेली, यामुळे प्रशांत हा प्रचंड तणावात आला. अनेकदा त्याने पत्नीला घरी आणण्यासाठी प्रयत्न केले, परंतु तिचे आधीपासूनच प्रेमसंबंध असल्यामुळे ती परत यायला तयार नव्हती. प्रशांत हा एकटे जीवन जगत होता. अकोल्यात राहून मनस्ताप सहन करण्यापेक्षा गाव सोडण्याचा निर्णय त्याने घेतला आणि आपले साहित्य घेऊन तो नाशिकला गेला. नाशिक शहरात कोणतीही मोलमजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. प्रशांतचे आई-वडील हे अकोल्यात रहात असल्यामुळे तो अधून-मधून अकोल्यात यायचा. अकोल्याला आल्यानंतर तो मुलांची आस्थेने चौकशी करण्याचा प्रयत्न करत होता. मानव उर्फ सोनू आणि विनायक हे दोन्ही मुले त्याच्यावर खूप प्रेम करत होती. दोन्ही मुले आईकडे रहात असली तरी ती वडीलांच्या संपर्कात होती. प्रशांत गावात आल्यानंतर न चुकता आपल्या मुलांना भेटत होता. नोव्हेंबर महिन्यात तो दिवाळीसाठी नाशिकवरून अकोल्याला आला होता.

प्रशांतची एक बहीण अकोला येथेच रहाते. विकास उर्फ विकी गोपे असे त्याच्या भाच्याचे नाव आहे. प्रशांत अकोल्यात आल्यानंतर तो विक्कीसोबतच फिरायचा. मामा-भाचा यांनी विनायक आणि मानव या दोघांची भेट घेण्याचे ठरवले होते. मानव हा आपल्या वडीलांच्या भेटीसाठी आतुर झाला होता. अखेर दोघांची दुपारी भेट झाली. प्रशांत मोठा मुलगा मानव दोघे एकमेकासोबत होते. दुपारी सोबत वेळ घालवल्यानंतर मानव वडीलांसोबत आजी-आजोबा रहात असलेल्या एकतानगर येथे आला. सकाळपासून मानव घरी आला नाही म्हणून त्याच्या आईने संगीताने त्याची शोधाशोध केली. रात्री साडेसात वाजेपर्यंत तो सापडला नाही. दुसरीकडे  आपला पती प्रशांत हा दोन-तीन दिवसापासून अकोल्यात असल्याची माहिती तिला होती.

ती आपल्या मुलाच्या शोधात एकतानगरात पोचली. दि. १९ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री साडेसात वाजता ती एकतानगरात आल्यानंतर तिचे सासू-सासरे, पती आणि मोठा मुलगा मानव हे सगळे एकत्रच तिला दिसला. मानवला पतीच्या सानिध्यात पाहून तिचा पारा चढला. तिने अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. वृद्ध सासू-सासरे, पती यांना शिवीगाळ करत, तिने मानवला ओढतच घराकडे नेण्याचा प्रयत्न करू लागली. मुलाचे हाल पाहून प्रशांत संतप्त झाला. यावेळी प्रशांतचा भाचा विकीही येथे हजर होता. संगीताच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. ती एकीकडे सासू, सासरा, नवर्‍याला शिव्या देत होती, तर दुसरीकडे मुलाला ओढून घेऊन निघाली होती. मानव तिच्या हातातून आपली सुटका करण्यासाठी धडपडत होता. हा प्रकार पाहून प्रशांत संतापला. तो तावातावाने घरात गेला, आणि तलवार घेऊनच बाहेर आला. तो आणि त्याचा भाचा विक्की या दोघांनी संगीतावर सपासप वार केले. संगीताच्या पोटावर तलवारीचा घाव बसल्यामुळे ती जमिनीवर कोसळली. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. सगळीकडे धावाधाव सुरू झाली. या घटनेची माहिती लहान मुलगा विनायकला कळल्यानंतर त्यानेही वडीलांच्या घराकडे धाव घेतली. यावेळी त्याची आई संगीता रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेली होती. परिसरातील कोणीतरी या घटनेची माहिती सिव्हिल लाईन व अकोट फाइल पोलीस ठाण्याला दिली.

 अकोट फाइल पोलीस स्टेशनजवळ असल्यामुळे या पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अस्लम शेख, अनिल सुर्यवंशी, संजय धांडे तातडीने घटनास्थळावर पोहोचले. यानंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मडावी, पी.एस.आय. तुषार नेवारे संतोष गावंडे, दशरथ बोरकर, रवी काटकर, रवी यादव, संजय ताले यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपी प्रशांत पांडुरंग इंगळे हा घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी त्याला पकडले. आरोपी प्रशांतने जाग्यावरच गुन्ह्याची कबुली दिली. या हत्याकांडात त्याला सहकार्य करणारा त्याचा भाचा विक्की याचे नावही त्याने पोलिसांना सांगितले. विकी घटनास्थळाहून पसार झाल्यानंतर २४ तासात पोलिसांनी त्याला अटक केली. प्रशांत इंगळे आणि विक्की यांचा पोलीस कोठडी रिमांड घेतल्यानंतर त्यांनी घटनेत वापरलेली अवजारे, धारदार शस्त्र, रक्ताने माखलेले कपडे पोलिसांच्या स्वाधीन केले. एकता नगर हे घटनास्थळ सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे हा तपास सिव्हिल लाईन ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे यांच्याकडे देण्यात आला. दोन्ही आरोपींचा पोलीस रिमांड संपल्यानंतर त्यांची रवानगी अकोला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

तपास अधिकार्‍यांनी काढलेल्या माहितीवरून, या प्रकरणातील संगीता प्रशांत इंगळे ही एका मुस्लीम व्यक्तीसोबत गेल्या सहा वर्षापासून रहात होती. दौला नामक या व्यक्तीने संगीताच्या प्रेमापायी आपल्या परिवाराला सोडून दिले होते. दोघेही अकोट फाइल भागातील अण्णाभाऊ साठे नगर येथे एका खोलीमध्ये रहात होते. संगीताची मुलेही येथेच रहायची. दौला हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर अकोट फाइलसह विविध ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दौला हा गुन्हेगारी स्वरूपाचा असल्यामुळे तो चोर्‍या करून घर खर्च चालवत होता. संगीता आणि तिची दोन मुले दौलाच्या कमाईवर जगत होती. दोघांचे प्रेमसंबंध असल्यामुळे दौला तिला आपल्या पत्नीसारखेच वागवत होता. या सर्व गोष्टीची माहिती मित्र परिवाराकडून प्रशांतला मिळत होती. पत्नीने दगाबाजी केल्यामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले असा राग प्रशांतच्या मनात होता. नाशिकला जाऊन काम करणार्‍या प्रशांतच्या मनात संगीताचा काटा काढण्याची कल्पना आली. तिला या जगातून कायमचे संपवायचे असा त्याने मनाशी चंग बांधला होता, परंतु प्रशांतचे आई-वडील, मित्र, भाचा यांनी प्रशांतला अनेकदा समजावले. घरातील मंडळींनी सांत्वन केल्यानंतर प्रशांत पुन्हा दुःख विसरून जायचा. आपल्या कामावर नाशिकला निघून जायचा. गेल्या सात वर्षापासून त्याच्यासोबत हाच खेळ सुरू होता. मनमिळावू स्वभाव असलेल्या प्रशांतला कोणत्याही प्रकारचा छंद नाही. तो आपल्या पत्नीवर आणि मुलांवर खूप प्रेम करायचा. पत्नीच्या या वागण्यामुळे तो प्रचंड बेचैन झाला होता. याआधी त्याने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पत्नी आणि मुले जवळ नसल्यामुळे सैरभैर झालेल्या प्रशांतला जीवन नकोसे झाले होते. पत्नी आणि मुले जवळ नाही तर जगून काय उपयोग असा विचार त्याच्या मनात सतत धुमसत होता.

दिवाळीला आल्यानंतर आई-वडीलांची भेट घ्यावी, मुलांची भेट घ्यावी आणि यानंतर पुन्हा नाशिकला निघून जावे असा त्याचा कार्यक्रम होता, मात्र अचानक संगीताबरोबर भांडण पेटले आणि त्याच्या हातून संगीताचा खून झाला. आता त्याचा मुक्काम नाशिकऐवजी अकोला कारागृहात झाला. या हत्याकांडामुळे संगीता ही जीवाला मुकली तर प्रशांत हा कारागृहात जाऊन बसला.

*दौलावर गुन्हा दाखल

या हत्याकांडातील पडद्यामागचा कलाकार दौला याच्यावरही पोलिसांनी हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. संगीतावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती त्याला मिळाल्यानंतर त्याने धारदार शस्त्र घेऊन प्रशांतच्या घराकडे धाव घेतली होती, मात्र रस्त्यातच तो पोलिसांच्या हाती सापडल्यामुळे त्याचा कोणताही उद्देश सफल झाला नाही. अखेर पोलिसांनी त्याच्यावर हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करून त्याला अटक केली. दौला हा जामिनावर सुटला, मात्र प्रशांत आणि विक्की यांचा मुक्काम कारागृहात वाढलेला आहे. मानव आणि विनायक ही दोन्ही मुले माता-पित्यांच्या प्रेमाला कायमची मुकली आहेत. माजी सैनिक असलेले पांडुरंग इंगळे यांच्या आधाराने आता हे दोन्ही मुले रहात आहेत.

*गुन्हेगारांचा अड्डा अकोट फाइल*…..

अकोला शहरातील अकोट फाइल हा अतिसंवेदनशील भाग असून गुन्हेगारांचा अड्डा म्हणून याची ओळख आहे. दररोज किरकोळ कारणावरून वाद खून, मारामार्‍या, चोर्‍या यासारख्या गंभीर घटना या परिसरात दररोज घडतात. एकता नगर आणि अण्णाभाऊ साठे नगर हे दोन्ही परिसर याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. पोलिसांसाठी कायमची डोकेदुखी असलेला हा परिसर सर्वसामान्य लोकांसाठी त्रासदायकच आहे. अतिशय किरकोळ कारणासाठी येथे खून झाल्याची अनेक उदाहरणे पोलीस दप्तरी नोंद आहे. संगीता प्रशांत इंगळे या महिलेच्या हत्येने यामध्ये भर पडली. पांडुरंग इंगळे यांचा वृद्धापकाळ असल्यामुळे आता मुलांच्या जामिनासाठी त्याची पायपीट होत आहे. मुलगा प्रशांत जामिनावर बाहेर आल्यास तो आमच्याकडे लक्ष देईल आणि त्याच्या मुलांकडेही लक्ष देईल अशी आशा पांडुरंग इंगळे यांना आहे. मात्र न्यायालयातून त्याला जामीन मिळेल की नाही याबाबत सध्या सांगता येत नाही. या प्रकरणातील तपास अधिकारी पी.एस.आय. तुषार नेवारे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे तयार केले आहेत. आरोपींना या हत्या प्रकरणात शिक्षा होईल असा दावा त्यांनी केला. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम पोलीस निरीक्षक मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. नेवारे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. या प्रकरणी सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात अपघात क्रमांक ४८५/२०२० कलम ३०२, २०१, ४, २५ नुसार गुन्हा दाखल असून याबाबतचे दोषारोपपत्र लवकरच न्यायालयात सादर करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

– नरेंद्र बेलसरे

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!