पोलीस टाइम्स
अहमदनगर पश्चिम महाराष्ट् पुणे महाराष्ट्र मुंबई उपनगर मुंबई शहर सांगली सातारा सोलापूर हेडलाइन

मोबाईलवरील संभाषण ठरते भांडणास कारण! एखाद्याच्या नशिबी येते त्यामुळेच मरण!

पुणे-हिंजवडी

छत्तीसगढ राज्यातील माटपारा (जि. बलोदा बाजार) येथील गजानन जमुनाप्रसाद निषाद (वय 28) हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. वाढता संसार आणि कामाचा अभाव यामुळे पोटा-पाण्याचा प्रश्‍न बिकट बनला. उपासमारीला तोंड दयावे लागल्याने तो काम-धंद्यासाठी महाराष्ट्रात आला. तीन महिन्यापूर्वी कैलास हिंदुजा यांच्या पुनावळे गावातील पांढरेवस्तीमध्ये असलेल्या लेबर कॅम्पमध्ये आपल्या पत्नी राणौ व दीड वर्षाची मुलगी देवश्री यांच्यासह राहू लागला. तर दुसरी दोन जय (वय 8) व आदित्य (वय 5) हे दोघे मुलगे गावीच ठेवले होते. गजाननला दारूचे व्यसन होते. त्याच्या व्यसनामुळे त्याची पत्नी, मुलांनाही त्रास सोसावा लागत असे. त्यामुळे त्याला काही सांगत बसण्यापेक्षा त्याच्याबरोबर त्याच्या पत्नीलाच काहीतरी काम बघून दिले तर निदान त्याचा उदरनिर्वाह तरी चालेल अशी नातेवाईकांची भावना झाली होती. तिचा नात्याने भाऊ असलेल्या महेश तिच्या कामासाठी प्रयत्न करत होता. पुणे-पिंपरी चिंचवड-जवळील वाकड येथील ठेकेदार फुलचंद  हे त्यांच्या ओळखीचे होते. त्याने त्यांना विनंती केली आणि गजाननला तेथे कामासाठी पाठवले. मग त्या महेशनेच थोडे-फार पैसे जमा करून राणौजवळ दिले. त्यानंतर राणौ, पती गजानन, मुलगी देवश्री यांना घेऊन वाकडला आले. त्यांना तेथील ठेकेदाराने बांधकाम साईटवरचे काम समजावून सांगितले. तेथील लेबर कॅम्पमध्ये रहाण्याचीही व्यवस्था केली. तेथे रोजगार करून त्या दोघांचा संसार सुरू होता. गजानन दिवसभर काम करून आला की संध्याकाळी दारू पिऊन यायचा व तो दारू पिऊन आल्यावर दोघा नवरा-बायकोचे भांडण व्हायची. असे रोजचे त्यांचे रडगाणे सुरू होते.

दरम्यान याच साईटवर संभू नावाची एक व्यक्ती राणौच्या संपर्कात आली होती. त्याने त्याचा नंबर राणौला दिला होता. ते दोघे वेळ मिळेल तेंव्हा मोबाईलवर बोलत असायचे. ही गोष्ट गजाननला दारू पितांना कोणीतरी कामगाराने सांगितली होती, त्यामुळे गजाननला तिच्याबद्दल संशय वाटू लागला. तिचे आणि संभूचे काहीतरी संबंध असतील या संशयाने तो पछाडला.

 दि.18 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राणौच्या पोटात दुखत असल्याने ती नेहमीप्रमाणे कामास न जाता घरीच थांबली होती, तर कामगारांना नेण्याकरता कॅम्पमध्ये जितु सहा याचे भाऊ तुळशी शेठ हे आले. तेंव्हा गजाननने आपली पत्नी आजारी असल्याने कामाला येणार नसल्याचे सांगितले. त्यावर तुळशीशेठ यांनी  राणौला दवाखान्यात सोडतो म्हणून आपल्या कारमध्ये घेतले आणि दोघा पती-पत्नीला त्यांच्या ओळखीच्या संताई क्लिनीक हॉस्पिटलमध्ये सोडले आणि लेबर सोडण्याकरता ते साईटवर गेले. राणौने दवाखान्यामध्ये औषध वगैरे घेतले आणि ती गजाननसह रिक्षाने पुन्हा लेबर कॅम्पमध्ये आली. साधारण दहा वाजण्याची वेळ झालेली असावी. राणौ जेवण करून औषध घेऊन आराम करत होती. त्याच दरम्यान तुळशीशेठ तेथे आले. त्यांनी गजाननला कामावर न जाता देखभाल कर असे सांगितले, त्यामुळे गजानन कामावर न जाता घरीच थांबला. थोड्या वेळाने त्याने राणौकडून मजुरीचे 4,500 रूपये  घेतले.  हातात पैसे पडताच तो घरातून बाहेर पडला. त्याने थेट डांगे चौक गाठला व तेथे जावून मनसोक्त दारू पिऊन आला. येतांना चार क्वार्टर दारू घेऊन आला. दारूच्या चार बाटल्या आणलेल्या पाहिल्यावर राणौला त्याचा चांगलाच राग आला होता. अगजाननने घरात बसून चारही बाटल्या दारू ढोसली. बाटल्या बाहेर टाकून दिल्या. राणौ आपली गप्प पडून राहिली होती. याच दरम्यान राणौच्या मोबाईलवर फोन आला. हा फोन ती पूर्वी काम करत असलेल्या बांधकामावरील संभूचा होता. हा फोन गजाननने उचलला. पलिकडून संभूचा आवाज ऐकताच त्याने माथे भडकले. त्याने फोनवरच संभूला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली, ‘माझ्या बायकोच्या मोबाईलवर का फोन केलास? तुझे काय काम होते?’ असे बडबडत त्याने फोन बंद केला. आता तो राणौकडे वळला. आजारी राणौला त्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. तो तिला शिवीगाळ करत मारहाण करत होता. त्याच्यापासून बचाव करत ती मुलीला अंगावर दूध पाजत होती.

चिडलेला गजानन घरातून बाहेर पडला, घराबाहेर कामगार लाकडे फोडण्यासाठी वापरत असलेला मोठा दगड पडला होता. तो दगड घेऊन तो आला. त्याला तो दगड नीट उचलताही येत नव्हता, तसाच भेलकांडत तो आत आला. त्याचा हा अवतार पाहून ती मनातून घाबरली. तो दारूच्या नशेत असल्याने त्याच्या हातून दगड खाली पडला. तो दगड घेण्यासाठी प्रयत्न करू लागला, तो दगड उचलून आपल्या जीवाला काहीतरी करणार या विचाराने ती जागची हलली. तिने देवश्रीला अंगावरून  बाजूला सोडले. पुढचा-मागचा विचार न करता तिने दगड उचलला आणि गजाननच्या डोक्यात घातला. एका फटक्यात तो घायाळ होऊन खाली कोसळला. थोडा वेळ गजानन तडफडला व नंतर शांत झाला. संध्याकाळचे सहा वाजत आले होते, त्यावेळी ठेकेदार तुळशीशेठ पुन्हा लेबर कॅम्पमध्ये आले. गजाननचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनला संपर्क साधला. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि सारे सोपस्कार आटोपून राणौला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. तिला रितसर अटक करून तिच्याविरुध्द हिंजवडी पोलीस स्टेशनला गुन्हा रजि.नं. 314/19 ला भा.दं.वि. कलम 302 प्रमाणे नोंदवला.

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!