पोलीस टाइम्स
इतर बातम्या कथा सामाजिक हेडलाइन

कौटुंबिक हिंसाचाराचे स्वरूप

काही वर्षा पूर्वीची घटना एक प्रोजेक्ट निमित्याने एका मतिमंद शाळेला भेट देऊन काही केसेसच अभ्यास करायचा होता. त्यावेळी केस स्टडीसाठी एका मुलीची फाईल मला देण्यात आली. त्याच्या केसहिस्ट्रीत मुलगी गर्भात असताना नवर्‍याने दारु पिऊन मारले त्यामुळे गर्भातच डोक्यावर इजा झाल्याने तिला हे व्यंग झाले होते. घरघुती हिंसाचारांची बळी पडलेली अशी कितीतरी अपत्ये रोजचं जन्माला येत असतील. समाजाच्या जवळपास प्रत्येकच घटकातून स्त्री कधी न कधी कुठे न कुठे हिंसेची बळी पडतच असते. गरजेचे नाही की घरघुती हिंसाचार हा फक्त फक्त सासरची मंडळीच करतात. तो बरेच दा माहेरची म्हणजेच घरची मंडळी देखील करतात. सासु व नणदा एकत्र कुटुंबात पतीपत्नीत भांडणे लावतात. पती सोबत राहत नाहीत.महिला मुलांसोबत एकटी भाड्याच्या खोलीमध्ये राहते.  अपत्याचा जन्म झाल्यापासून तिचा खाण्या पिण्याचा, शिक्षणाचा खर्च स्त्री एकटीच करते. पतीची मदत नाही.

 खरंतर बहुतांश महिलांना त्यांच्यासोबत जे काही होत आहे ते घरगुती हिंसाचार आहे किंवा तो वर्तन घरगुती हिंसाचारच्या कक्षेत येतो याची कल्पना ही नसते. ही सून किंवा मुलगी आहे म्हणून तिने हे सहन केलेच पाहिजे ही घरच्यांची समाजात व्याप्त भावना आढळून येते. त्यामुळे पीडित किंवा कुठलीही स्त्री आपल्यावर हिंसाचार होत आहे हे गृहीत धरतच नाही. त्यामुळे बरेचदा नवीन लग्न झाल्यावर मिळणारी वागणूक सासरची मंडळी अशी वागतात व काही दिवसांनी सगळे सुरळीत होऊन जाईल अशी धारणा असते. त्यामुळे क्षुल्लक गोष्टींवर दुर्लक्ष केले जाते किंवा ते गृहीतच धरले जात नाही. त्याची बरेचदा माहेरी तक्रार ही होत नाही. झाल्यास कोणी फारसं लक्ष देणं किंवा ऐकूनही घेत नाही. कौटुंबिक हिंसेने त्रस्त मुलगी जेव्हा माहेरी येते. तेव्हा काही पालक तिच्याशी चांगले वागून काही दिवसांनी पुन्हा सासरी नेऊन सोडतात. नातं टिकवायला बाईनेच नमतं घ्यावं अशी भूमिका असते. मुलीला सासरी नाही सोडलं तर घरात, शेजारी कुजबूज चालू होते. लोकही नंतर मुलगी माहेरी एवढे दिवस कशी काय असं सतत विचारू लागतात. तेव्हा मुलीलाच दोषी ठरवून तिचा तिरस्कार करतात. तिला, तिच्या मुलांना भेदभावाची वागणूक दिली जाते. आई-बापाच्या उरावरचा धोंड अशी वागणूक दिली जाते.

कौटुंबिक नातेसंबंधातील व्यक्तीने घरात केलेली हिंसा म्हणजे कुटुंबांतर्गत स्त्रीवर होणारी हिंसा घटना घडल्यानंतर तातडीने नोंदविल्या जात नाहीत. मात्र सतत घडणारे शारीरिक-मानसिक कमी-अधिक गंभीर प्रकारचे अत्याचार व त्यातून पीडित स्त्रीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. घरात, नातेवाइकांसमक्ष हिंसा घडल्याने पीडित स्त्रीला पाठिंबा, साक्षी-पुरावे हे अभावानेच मिळतात. फौजदारी प्रक्रियेमध्ये ठळक पुराव्यांधारे आरोपीवरील गुन्हा सिद्ध करून त्याला शिक्षा देण्यावर जास्त भर दिसतो. पोलिसांकडून स्त्रीची तक्रार दाखल करून घेण्यापेक्षा तडजोड करून तिला सासरी नांदायला पाठविण्यावर भर दिला जातो असे अनेकदा दिसते. खून, मारामारी, कोरी दरोडा हाळतळणार्‍या पोलिसांना नवऱ्याने बायकोला शिवीगाळी किंवा आर्थिक कोंडी वगैरे ‘किरकोळ कौटुंबिक वाद’ वाटतात. छळ करणाऱ्याला शिक्षा होण्यापेक्षा अत्याचारापासून संरक्षण मिळवणे महिलांसाठी अनेक वेळा गरजेचे असते. कौटुंबिक हिंसेसंदर्भात स्वतंत्र असा कायदा नव्हता.

व्हिएतनाम समझौता १९९४ आणि बिजींग अधिघोषणाकृती समितीचे व्यासपीठ १९९५ यांनी मान्यता दिली आहे. महिलांवरील भेदभाव संपूर्णपणे मिटविण्यासाठीच्या संयुक्त कृती समितीच्या १९८९च्या कॉमन रेकमेंडेशन नुसार संबंधित देशांनी स्त्रियांच्या कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध संरक्षण पुरविण्यासाठी पावले उचलावीत व तसा कायदा निर्माण करावा विशेषकरून महिलांना कुटुंबात होणाऱ्या हिंसाचारापासून संरक्षण देण्यासाठी कायदा करावा. म्हणून यासंदर्भात आजवर राहून गेलेल्या सर्वबाजूंनी स्त्री शोषण थांबविण्यासाठीही हा ठोस व निर्णायक कायदा अस्तित्वात आला. हिंसाग्रस्त स्त्रीला तातडीची मदत, राहत्या घरात सुरक्षित राहण्याचा हक्क आणि न्याययंत्रणेपर्यंत तिची पोहोच वाढवणे यासाठी नवीन कायद्याची गरज होती. स्त्रीवादी संघटना, अभ्यासक यांनी मांडलेल्या अनेक सूचना, तळागाळात पीडितांबरोबर काम करणाऱ्या महिला संघटना यांच्याकडून आलेल्या सूचना या सर्वाचा विचार करून कौटुंबिक हिंसेपसून संरक्षण कायदा २००५तयार करण्यात आला. या कायद्याद्वारे पीडित महिलेला न्याय, संरक्षण मिळू शकते. या कायद्याच्या आधारे पीडित महिला तिच्या अथवा तिच्या मुलांविरुध्द होणारे अत्याचार थांबवू शकते. स्त्रीधन, दागदागिने, कपडे इत्यादींवर ताबा मिळवू शकते. संयुक्त खाते अथवा लॉकर हिंसा करणाऱ्या पुरुषास वापरण्यास प्रतिबंध करु शकते. स्त्री ज्या घरात राहत असते ते घर सोडावे लागणार नाही. हिंसाकारी पुरुषास स्त्री राहात असलेले घर विकण्यास प्रतिबंध करु शकतो. वैद्यकीय उपचाराचा खर्च मागू शकतो भावनिक व शारीरिक हिंसाचाराबद्दल नुकसान भरपाई स्त्रीला मागता येते. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा कुटुंबातील कोणत्याही पुरुष नातेवाईकाकडून जर स्त्रीचा शारीरिक वा मानसिक, आर्थिक,सामाजिक वा इतर प्रकारचा छळ होत असेल तर ह्या कायद्यांतर्गत स्त्रीला दादच नाही तर संरक्षणही मागता येते. या कायद्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात संरक्षण अधिकार्‍यांना संरक्षण देण्यासाठी नेमण्यात येऊ शकतं. विशेषत: हे संरक्षण अधिकारी विशेष प्रशिक्षित व अनुभवी स्त्रियाच असतील. तसेच पीडित महिलांना मदतीसाठी काही सेवाभावी संस्थही नेमण्याची व्यवस्था आहे.

कौटुंबिक छळ/हिंसाचार म्हणजे काय? तर एकाच घरात राहणार पुरुष नातेवाईक जर स्त्रीला मारहाण, शिवीगाळ करत असेल. तिला हुंड्याच्या मागणीवरुन धमकावीत असेल, घरातून हाकलत असेल. दारू वा इतर नशेमुळे मारहाण करत असेल, तिच्याकडून पैसे घेत असेल, घरातले सामान विकत असेल. तिला दररोज लागणार्‍या गरजांपासून वंचित करत असेल. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे शारीरिक, शाब्दिक, लैंगिक, मानसिक किंवा आर्थिक छळ, हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी महिलेला अपमानित करणे, तिला शिवीगाळ करणे, विशेषत: अपत्य नसल्यामुळे तिला हिणवणे किंवा धमकावणे, त्रास देणे, दुखापत करणे, जखमी करणे किंवा पीडित महिलेचा जीव धोक्यात आणण्यास भाग पाडणे किंवा तिच्या कोणत्याही नातेवाईकाकडे हुंडयाची मागणी करणे व या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम पीडित व्यक्ती अथवा तिच्या नातेवाईकांवर होणे तसेच आर्थिक छळ करणे म्हणजे महिलेचे स्वत:चे उत्पन्न, स्त्रीधन, मालमत्ता किंवा इतर आर्थिक व्यवहार किंवा तिच्या हक्काच्या कोणत्याही मालमत्तेपासून तिला वंचित करणे, घराबाहेर काढणे या बाबींना कौटुंबिक हिंसाचार म्हटले जाते.

शारीरिक छळात मारहाण, तोंडात मारणे, तडाखा देणे, चावणे, लाथ मारणे, गुद्दे मारणे, ढकलणे, लोटणे (जोराचा धक्का मारणे), इतर कोणत्याही पध्दतीने शारीरिक दुखापत किंवा वेदना देणे. या बाबींचा शारीरिक छळात समावेश होतो. दुस-या व्यक्ती वर  नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना ब-याच वेळा शारीरिक इजा केली जाते. त्यामध्ये पुढील प्रकारच्या हिंसेचा वापर करणे. ठोसा मारणे, मारहाण करणे, गळा दाबणे, चटका देणे, थप्पड मारणे, वस्तू फेकून मारणे, लाथ मारणे, ढकलून देणे, सुरा,चाकू, काठी,दाभण,भांडी,सळई सारख्या इतर हत्यारांचा वापर, थुंकणे, ओरबडणे, चिमटे काढणे, चावणे व इतर अनेक प्रकार

लैंगिक अत्याचारामध्ये लैंगिक छळ शारीरिक बळाचा वापर करून किवा न करता स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध करावयास भाग पाडणे.  यामध्ये पुढील प्रकारच्या लैंगिक हिंसा दिसून येतात. जबरदस्तीने संभोग, बलात्कार, विवाहा अंतर्गत बलात्कार, छेडछाड, इच्छेविरुद्ध शारीरिक स्पर्श, सहेतुक लैंगिक भाषेचा वापर, आई-बहीण वरून शिव्या, लैंगिक अवयवांना इजा, मोबाईल वरून अश्लील बोलणे व अश्लील चित्र, व्हिडिओ पाठविणे/दाखवणे, पॉर्न फिल्म दाखविणे, इच्छेविरुद्ध / त्यांना माहित नसताना त्याच्याच लैंगिक अवयवांचे फोटो काढणे व इतर अनेक प्रकारनियत्रण/बंधन घालणे होतो.

तोंडी आणि भावनिक अत्याचार जसे अपमान करणे, वाईट नावाने बोलावणे, चारित्र्याबद्दल संशय घेणे, मुलगा झाला नाही म्हणून अपमान करणे, हुंडा आणला नाही म्हणून अपमान करणे. महिलेला किंवा तिच्या ताब्यात असलेल्या मुलाला शाळेत, महाविद्यालयात किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यास मज्जाव करणे, नोकरी स्वीकारण्यास व करण्यास मज्जाव करणे, स्त्रीला व तिच्या ताब्यात असलेल्या मुलाला घरामधून बाहेर जाण्यास मज्जाव करणे, नेहमीच्या कामासाठी कोणत्याही व्यक्तीबरोबर भेटण्यास मज्जाव करणे, महिलेला विवाह करावयाचा नसल्यास विवाह करण्यास जबरदस्ती करणे, महिलेच्या पसंतीच्या व्यक्ती बरोबर विवाह करण्यास मज्जाव करणे, त्याच्या अथवा त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर विवाह करण्यास जबरदस्ती करणे, आत्महत्येची धमकी देणे इतर कोणतेही भावनात्मक किंवा तोंडी अपशब्द वापरणे यांचा समोवश होतो. मानसिक/भावनिक हिंसेमध्ये पुढील प्रकार दिसून येतात. यामध्ये व्यक्तीला वाईट व हीन वागणूक,  व्यक्तीला जास्तीत जास्त परावलंबी व दुय्यम असल्याची जाणीव करून देणे. सतत टीका करणे, चुका काढणे, अपमान करणे, स्वतःला, तिला किवा जवळच्या व्यक्तींना इजा करण्याची धमकी देणे, आवडते कपडे, दागिने, वस्तूचे नुकसान करणे, मोडतोड करणे, वारंवार शाब्दिक मार, अबोला धरणे, माहेरच्या व्यक्तींबद्दल वाईट बोलणे, सतत संशय घेणे, अविश्वास दाखवणे, घरातून निघून जाण्यासाठी सांगणे.व इतर अनेक प्रकार

आर्थिक अत्याचारात हुंडयाची मागणी करणे, महिलेच्या किंवा तिच्या मुलांचे पालन –पोषणासाठी पैसे न देणे, महिलेला किंवा तिच्या मुलांना अन्न, वस्त्र, औषधे इत्यादी न पुरविणे, नोकरीला मज्जाव करणे, नोकरीवर जाण्यासाठी अडथळा उत्पन्न करणे, नोकरी स्वीकारण्यास संमती न देणे, पगारातून रोजगारातून आलेले पैसे काढून घेणे, महिलेला तिचा पगार, रोजगार वापरण्यास परवानगी न देणे, राहात असलेल्या घरातून हाकलून देणे, घराचा कोणताही भाग वापरण्यास किंवा घरात जाण्यास, येण्यास अडथळा निर्माण करणे, घरातील नेहमीचे कपडे, वस्तू वापरण्यापासून रोखणे, भाड्याच्या घराचे भाडे न देणे या बाबींचा समावेश होतो.

स्त्री ज्या परिवारासोबत वा साथीदारासोबत एकाच छताखाली रहात असेल आणि तिचा छळ त्या पुरुषाकडून होत असेल तर ती कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये न्यायदंडाधिकाऱ्याकडे संरक्षण मागू शकते. कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेली महिलेला तिचा नवरा, लग्न न करता एकत्र नवरा बायकोसारखे राहत असतील तर तो पुरुष, सासरा, दीर तसेच इतर रक्ताची नाती असलेली म्हणजे नवर्‍याचा काका, मामा या पुरुष नातेवाईकांविरुध्द दाद मागता येते. या कायद्यांतर्गत कौटुंबिक हिंसाचाराने पीडित पत्नी, सासू, बहिण, मुलगी, अविवाहित स्त्री, आई, विधवा इत्यादी म्हणजे लग्न, रक्ताचे नाते, लग्न सदृश्य संबंध (लिव्ह इन रिलेशनशीप), दत्तकविधी अशा कारणाने नाते संबंध असणाऱ्या व कुठल्याही जाती धर्माच्या स्त्रिया तसेच त्यांची 18 वर्षाखालील मुले दाद मागू शकतात. पण त्यासाठीची महत्त्वाची अट म्हणजे जी स्त्री पुरुषाविरुध्द दाद वा संरक्षण मागते, ते दोघेजण ही एकाच घरात/कुटुंबात राहत असले पाहिजे वा कधी एकेकाळी राहत असतील तरच दाद मागता येईल. त्याचप्रमाणे पीडित महिलेला मोफत कायदेविषयक केंद्राद्वारे सल्ला, सेवा पुरविणाऱ्या संस्था, वैद्यकीय सुविधा, निवासगृह इत्यादी मधून आवश्यक त्या सेवा सुविधा प्राप्त करुन घेता येतात. भारतीय दंड संहिता 498 अ कलमाखाली पोलिसात तक्रार दाखल करता येते. त्याचप्रमाणे भारतीय दंडसहितेच्या कलम 125 अंतर्गत मिळणाऱ्या पोटगी व्यतिरिक्त, अतिरिक्त पोटगी, स्वत:साठी तसेच स्वत:च्या अपत्यासाठी मागता येते.

इतका महत्वाचा कायदा असून देखील कौटुंबिक हिंसाचारच्या घटनेत फारशी घट दिसून येत नाही ग्रामीण ठिकाणी या विषयी माहिती कमी आढळून येते. कायद्याची माहिती असून देखील खोटी सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाची पालक तक्रार दाखल करीत नाही. या कायद्याविषयी अधिकाधिक माहिती प्रत्येक स्तरापर्यंत जाणं गरजेचं आहे.

—– कल्पना पांडे

2 comments

rakesh January 9, 2020 at 6:10 am

हास्यास्पद कायदा आहे हा..

Reply
Amol Deshmukh March 30, 2020 at 11:59 pm

Kalpanaji

Garguti hinsachar fakt purush kartat ka mahila karit nahit ka… Krupaya spata Kara.

Reply

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!