पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा नागपूर विदर्भ हेडलाइन

वर्चस्वासाठी एकमेकाला भिडले गुंड, कुणाल, सुशीलवर तुटून पडली झुंड.

उपराजधानी असल्यामुळे नागपूर शहराला विशेष महत्त्व आहे. केंद्रातील व राज्यातील मंत्री नागपुरात असल्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवणे पोलिसांची मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी नेहमीच पार पाडण्यासाठी पोलिसांची चोख व्यवस्था असूनही शहरात अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रीय आहेत. अवैध व्यवसायातून भरमसाठ पैसा टोळ्यांना मिळत असल्याने वर्चस्व राखण्यासाठी, टोळीचा दबदबा रहावा म्हणून अनेकदा टोळीयुद्ध भडकते. या भडक्याचा स्फोट होतो तेंव्हा कोण कुणाचा गेम करेल याचा नेम नसतो. टोळीयुध्दातूनच दोन गुन्हेगारांची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडल्याने नागपूर हादरले आहे.

०००

बाल्या ऊर्फ जागेश्वर दुधनकर हा पुर्वी नागपुरातील बीट्स टोळीचा सदस्य होता. कालांतराने पैशाच्या वादातून त्याने ही टोळी सोडली होती आणि लगेच त्याने स्वत:ची टोळी निर्माण केली. त्याने आपल्या टोळीत अनेक तरूणांना खेचले व त्यांच्यामार्फत गुन्हे करू लागला. विजू मोहोड हाही या परिसरातील कुख्यात गुंड होता. त्याचा परिसरात दबदबा होता, मात्र काही दिवसांपूर्वीच टोळीयुध्दातून विजू मोहोडची हत्या करण्यात आली होती. ही हत्या कशाप्रकारे व कोणत्या कारणांमुळे करण्यात आली याची कथा साप्ताहिक पोलीस टाइम्सने यापूर्वी प्रकाशित केली होती. विजूच्या हत्येनंतर दिघोरी व हुडकेश्वर परिसरात स्वत:चा दबदबा निर्माण करण्यासाठी बाल्या दुधनकर हा धडपडत आहे. आपणच या परिसरातील डॉन असल्यासारखे तो भासवत होता. प्रतिस्पर्धी असलेल्या बीट्स टोळीचे सदस्य कारागृहात असल्याने बाल्याने दिघोरी व हुडकेश्वर परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात आपले पाय जमवायला सुरूवात केली.

कुणाल चरडे (वय २९) हा गुंड कधी काळी कुख्यात गुंड दिलीप ठवकर याचा साथीदार होता, तेंव्हापासूनच कुणाल व बाळूमध्ये धुसमुस सुरू आहे. अनेकदा बाळूने त्याला मार्गातून हटण्यासाठी दम दिला होता, मात्र कुणाल हा त्याला वरचढ ठरायला लागला, त्यामुळे दोघेही कट्टर वैरी बनले. एकमेकांचे तोंड पहाणे त्यांना पसंत नव्हते, त्यामुळे दोघात नेहमीच वाद होत असे. 

रविवार दि. १५ नोव्हेंबरला सायंकाळी बाळू व त्याचे साथीदार दिघोरीतील पानठेल्यावर गेले असता तेथे कुणाल चरडे हा आला होता. त्यावेळी कुणालसोबत त्याचा मित्र सुशील सुनिल बावने (वय २४) होता. बाल्या आणि कुणाल दोघांनी एकमेकांना पहाताच दोघांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कच्चे खावून टाकू कि इथेच खात्मा करू असा विचार दोघांच्या डोक्यात आला. कुणाल आणि बाळूची वर्चस्वाच्या कारणावरून बाचाबाची झाली. दोघेही एकमेकांच्या जिवावर उठले असतांनाच तेथे हजर असलेल्या इतर तरूणांनी मध्यस्थी करून वाद निवळला.

मात्र रागाने तापलेला बाल्या हा काही वेळाने हातात धारदार तलवार घेऊन पानठेल्यावर पुन्हा आला. कुणालचा खात्मा करून आपला आत्मा शांत करू असा विचार बाल्याच्या डोक्यात असावा! पुर्ण तयारीत आलेल्या बाल्याला मात्र  कुणाल त्याठिकाणी दिसलाच नाही, त्यामुळे तो परिसरात बराच वेळ हातात तलवार घेवून कुणालचा शोध घेवू लागला. गुंडाच्या हातात तलवार बघून तेथील दुकानदारांचा थरकाप उडाला. आज काहीतरी विपरीत नक्कीच घडणार असे दुकानदारांना समजले, त्यामुळे काही दुकानदारांनी लगेच आपापल्या दुकानाचे शटर खाली पाडून दुकाने बंद केली.

दरम्यान कुणाल व सुशील हे दारू पिऊन बाल्याच्या घरी गेले. यावेळी बाल्या घरी नव्हता. दोघांनी बाल्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ केली. कुणाल व सुशीलने घरी जाऊन शिवीगाळ केल्याचे बाल्याला कळले. तो तलवार घेऊन घरी येत असतांनाच रस्त्यात त्याला कुणाल दिसला. ‘कारागृहात असलेल्या दिलीस ठवकरने हत्येची सुपारी दिली. त्यामुळे तू माझ्यासोबत वाद घालत आहे,’ असे बाल्याने कुणालला म्हटला. यावरून कुणालने बाल्यासोबत वाद घातला. वाद पेटला आणि दोघांत झटापट झाली. कुणालवर बाल्या भारी पडला. बाल्यासोबत असणार्‍यांनी कुणाल व सुशील यांना बेदम मारले. अर्धमेल्या अवस्थेत असूनही कुणाल आणि सुशील घोळक्याच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी प्रतिकार करू लागले, परंतु त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरू लागले. दारूच्या नशेत असल्यामुळे दोघेही बाल्याच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करत असतांनाच बाल्याने व त्याच्या साथीदारांनी दोघांना मारून-मारून अर्धमेले केले. बाल्या आणि त्याच्या टोळीच्या डोक्यात भूत संचारले. आता कुणाल आणि सुशीलला जंगलात नेवून त्यांची पुन्हा धुलाई करू असे त्यांनी ठरवले. बाल्याने दोघांनाही लाथा-बुक्क्यांनी बेदम बदडले आणि एका कारमध्ये कोंबले. पाय ठेवतो त्या खोपच्यात दोघांना कोंबले. त्या दोघांच्या अंगावर पाय ठेऊन बाल्या दुधनकर, राहुल लांबट व निशांत शहाकार हे बसले. ते कार घेवून उमरेडच्या मार्गाने निघाले. रस्त्याने जातांनाही बाल्या, राहुल आणि निशांत या तिघांनी त्या दोघांना कारमध्येही मारहाण सुरूच ठेवली होती. त्यांना घेऊन बाल्या पाचगाव कुही मार्गावरील डोंगरगाव येथे आला. एका निर्जन ठिकाणी कार थांबली. याठिकाणी सुनसान होते. एकही माणूस दूरवर दिसून येत नव्हता. कुणाल व सुशील यांना फरफरटत कारमधून बाहेर खेचले. एका ठिकाणी धाडकन आपटले. आज ह्या दोघांना सोडले तर उद्या हेच आपला खात्मा करतील! असा विचार बाल्याच्या डोक्यात आला, त्यामुळे त्याने प्रतिस्पर्धी टोळीच्या या दोघांना कायमचे यमसदनी पाठवू असे ठरवले.

‘माझ्या घरात येवून मलाच दादागिरी दाखवता काय? हरामखोरांनो थांबा…तुम्हाला बाल्याचा हिसका दाखवतो.’ असे म्हणत बाल्या व त्याच्या साथीदारांनी चाकू व तलवारीने दोघांच्या डोक्यावर, पाठीवर व पोटावर सपासप वार केले. घटनास्थळी रक्ताचा पाट वाहू लागला. वार करताच रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. अरे बापरे….आई गं… असे म्हणत दोघेही तडफडू लागले. क्षमायाचना करत दोघेही बाल्यापुढे आपले प्राण वाचवण्यासाठी गयावया करू लागले, मात्र बाल्या व साथीदारा़च्या अंगात जणू भूत संचारले होते. तिघेही त्या दोघांना मारत राहिले. या निर्जन ठिकाणी सर्वजण रक्ताने माखले. दोघांना कायमचे संपवून टाकू असे म्हणत सिमेंटच्या इलेक्ट्रीक खांबाने डोके ठेचून दोघांची हत्या केली. दोघेही तडफडत निपचित पडले. एका टोळीच्या सदस्यांनी दुसर्‍या टोळीतील दोघा गुंडांचा खात्मा करून दुहेरी हत्याकांड घडवून आणले. दोघेही ठार झाल्याची खात्री केली आणि बाल्या, राहुल व निशांत या तिघांनीही तेथून काढता पाय घेतला. बुटीबोरी-वर्धा मार्गाने कार वेगाने चालली. पोलीस दिसताच सर्वजण सावध होवून पोलिसांच्या डोळ्यात धुळ झोकून पुढे सरसावले. एके ठिकाणी रक्ताने माखलेले हात-पाय धुतले आणि काहीच घडले नसावे अशा पावित्र्यात तिघे जण रममाण झाले.

सोमवारचा दिवस उजाडला. कुही फाट्याजवळची वर्दळ सुरू झाली. डोंगरगाव शिवारात दोन मृतदेह पडून असल्याची वार्ता समाजमाध्यमांवर वार्‍यासारखी पसरली. ही माहिती पोलिसांना मिळताच कुही पोलीस स्टेशनचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. जसजशी ही बातमी पसरत गेली, तसतशी लोकांची गर्दी याठिकाणी होवू लागली. रक्तबंबाळ असलेले दोन मृतदेह जमिनीवर पडून होते. दोन्ही मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला सिमेंटच्या इलेक्ट्रीक खांब पडलेला होता. प्रथमदर्शनीच ही हत्या असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, त्यामुळे पोलिसांनी पंचनामा सुरू केला. कुही पोलिसांनी ही माहिती वरीष्ठ अधिकार्‍यांना दिली. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेची गंभीर दखल घेत घटनास्थळ गाठले. सोबत अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे व पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले, मात्र ग्रामीण पोलिसांना प्रश्न पडला कि, हत्या करण्यात आलेले हे दोन मृतदेह कुणाचे? हत्या का करण्यात आली? आरोपी कोण व किती असतील? या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी आपले चक्र फिरवले. अगोदर मृतकांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आले. तांत्रिकदृष्टया तपास सुरू केला. गुन्हे शाखेने त्यांचे खबरे जागोजागी पाठवले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन मते, नरेन्द्र गौरखेडे, जावेद शेख, हेडकॉन्स्टेबल रमेश भोयर, महेश जाधव, मदन आसतकर, गजेन्द्र चौधरी, ज्ञानेश्वर राऊत, पोलीस नाईक सुरेश गाते, पोलीस कॉन्स्टेबल अमृत किनगे, राधेश्याम कांबळे, अमोल वाघ, विपीन गायधने, हवालदार भाऊराव खंडाते, पोलीस नाईक अमोल कुथे यांनीही सक्रीय होवून हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी धावपळ सुरू केली. नागपूरातील न्यूज पोर्टल व समाजमाध्यमांवर ही बातमी झळकताच चर्चेला उधाण आले. आरोपींचा तपास सुरू असतांनाच स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली कि, रविवारी रात्री दिघोरी परिसरात दोन गटात राडा झाला होता आणि दोन तरूणांना गाडीत कोंबून त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

हाच धागा पकडून गुन्हे शाखा पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. एक-एक धागा पकडून अखेर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली कि हे हत्याकांड बाल्या दुधनकर याने घडवून आणले आहे. मग काय? पोलिसांच्या तपासाची चक्रे तुफान वेगाने फिरायला लागली आणि याचा परिणाम असा झाला कि ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी घटनेची माहिती झाल्यापासून अवघ्या सहा तासातच बाल्या ऊर्फ जागेश्वर संतोषराव दुधनकर (वय ३३, रा. नीलकमल नगर नरसाळा रोड, दिघोरी, नागपूर), राहुल श्रावण लांबट (वय २७, रा. भांडेवाडी, पारडी, नागपूर) व निशांत प्रशांतराव शहाकार (वय २३, रा. खरबी रोड, शक्तिमातानगर, नागपूर) या तीन आरोपींच्या मुसक्या बांधल्या. कुख्यात गुंड ठवकरने सुपारी दिल्याच्या संशयातूनच कुहीतील डोंगरगाव येथे दुहेरी हत्याकांड घडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पकडण्यात आलेल्या तिघाही आरोपींना पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

या दुहेरी हत्याकांडात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पोलीस करत आहेत, तर शहरातील दोन प्रतिस्पर्धी टोळीत झालेल्या या हत्याकांडामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंडांना पोलिसांची भीती आहे कि नाही? हा प्रश्नही यावेळी उपस्थित झाला आहे!

– विजय तायडे

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!