पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र नाशिक सामाजिक हेडलाइन

सापडले सावज केली लुट, इतका विशाल पाजी. बिंग फुटेल या भितीतून बळी गेला रामजी.

रामजी अवघा ९ वर्षाचा बालक. शेजारच्या दादाबरोबर ङ्गिरायला गेला, तो परत आलाच नाही. ज्याच्याबरोबर तो गेला, तो विशाल होता पक्का गुंड. त्या गुंडाने रामजीसमोर एकाला चाकूने हल्ला करून लुटले. हे पहाणारा होता रामजी… रामजी कोणाला तरी सांगेल, त्यामुळे आपले बिंग ङ्गुटेल अशी भीती विशालला वाटू लागली. या भीतीतूनच त्या निर्दयी गुंडाने माणूसकीला काळीमा ङ्गासणारे पाऊल उचलले.

०००

सिंघवापूर, जि. बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथील रहाणारा लालबाबू यादव हा कुटुंबासह नाशिक शहरात व्यवसायाच्या निमित्ताने आला आहे. नाशिक रोड भागातील सासनगाव रस्त्यावर असलेल्या गाडेकर मळ्यात भाड्याने खोली घेवून हा परिवार राहू लागला. मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. लालबाबू यांना दोन अपत्ये होती. एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांचा संसार सुखाने सुरू होता. त्यांचा मोठा मुलगा रामजी लालबाबू यादव (वय ९) हा तिसरीच्या वर्गात शिकत होता. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने तो घरीच असायचा. चिमुकला रामजी परिसरात खेळत असे, शेजारी-पाजारी जात असे. लहानग्या निरागस बोलक्या रामजीचा सगळेच लाड करत. कोणत्याही तरूणासोबत जावून तो फिरून यायचा. त्याचे सगळे मजेत चालले होते.

गाडेकर मळ्यात १०-१२ भाड्याच्या खोल्या आहेत. लालबाबू यादव याच्यासह अनेक भाडेकरू या चाळीत रहातात. त्यांच्या घराशेजारीच विशाल विष्णू गेजगे (वय २४) हा तरूण त्याची पत्नी, आई व १ मुलगीसोबत रहातो. त्याची आई टिळक पथावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. आपल्या घरमालकाच्या ओमनी कारने तो आपल्या आईला घरून भाजीपाला नेवून पोहोचवण्याचे काम करत असतो, शिवाय नाशिक रोड भागात असलेल्या मालकाच्या किराणा दुकानासाठी त्यांच्या ओमनी कार गाडीतून किराणा माल आणून देण्याचे काम तो करत असे. काही वेळा विशाल घराशेजारी रहाणार्‍या रामजीलाही सोबत फिरायला घेवून जात असे.

विशाल हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. कधी काय तो करेल याचा भरंवसा नसे. मंगळवार दि. १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरमालकाने त्याला बोलावले आणि त्यांच्या नाशिक रोड येथील किराणा दुकानातील तेलाचे डबे आणण्यासाठी स्वतःची मारूती ओमनी कार (क्रमांक एम.एच.०२-एम.ए. ९७९५) विशालला दिली. त्यानंतर आपण तिकडेच जात आहोत म्हणून त्याने आपल्या घरातील भाजीपाला आईला पोेहोचवण्यासाठी कारमध्ये भरला. त्यावेळी कारजवळ घराशेजारचा रामजी आला आणि त्याच्याशी गप्पा-गोष्टी करू लागला, तेंव्हा ‘चल आपण फिरून येवू’ असे सांगत रामजीला कारमध्ये बसवले आणि कार सुरू करून ते नाशिक रोडला आले. नाशिक रोडला आल्यावर विशालने त्याचा मित्र स्वप्निल सोनवणे (वय २२, रा. भोरमळा, ना.रोड) यालाही आपल्यासोबत घेतले.

रामजी व स्वप्निलला घेवून विशाल कारने टिळक पथवरील दिव्या कलेक्शनजवळ भाजी विक्री करणारी त्याची आई वंदना गेजगे यांच्याकडे आला. काही भाजीपाला आईला देवून कारमधील आणखी भाजी घेवून मीना बाजार, देवळाली गाव, जेल रोड याठिकाणी येवून त्याने भाजीची विक्री केली. यात रात्र झाली. रात्री सव्वा आठच्या सुमारास घरी जाण्यापूर्वी विशाल व स्वप्निल या दोघा मित्रांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर रामजीसह दोन्ही मित्र सिन्नर फाट्याच्या दिशेने जात असतांना उड्डाणपुलाखाली विशाल आव्हाड (वय २६, रा. केपानगर, ता. सिन्नर) या प्रवाशाने त्याच्याकडे लिफ्ट मागितली. त्याला सिन्नरला जायचे होते, त्यामुळे त्याने त्यांना हात दाखवून त्याची गाडी थांबवली. विशाल सिन्नरला जात नसतांनाही त्याने या प्रवाशाला आपल्या कारमध्ये बसवले आणि गाडी दामटवली. विशाल व स्वप्निल या दोघांनी सामनगाव रस्त्याने कोटमगाव गाठले, तेंव्हा विजय आव्हाड या प्रवाशाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. विशालने मामाकडे जावू, त्यांच्याकडे भाजीपाला देवून पुढे जावू असे सांगितले, मात्र विशाल आणि स्वप्निल या दोघांच्या मनात वेगळेच शिजत होते. त्याचा थांगपत्ता कारमध्ये बसलेल्या प्रवाशाला नव्हता.

कोटमगावाकडून हिंगणवेढे गावाच्या अलिकडे निर्मनुष्य ठिकाणी हॉटेल राधिकाच्या पुढे गाडी आणून उभी केली. स्वप्निलने विशालच्या मदतीचे चाकूने प्रवासी विजयवर वार करत त्याला जखमी केले आणि त्याच्याजवळील ११ हजाराचा मोबाईल आणि खिशातील चार हजार रूपये लुटून त्याला गाडीखाली फेकले व  तेथून पोबारा केला. हा लुटीचा सर्व प्रकार कारमध्ये बसलेल्या चिमुकल्या रामजीने पाहिला.

विजय आव्हाड या प्रवाशाला लुटल्यानंतर विशाल लाखलगावमार्गे हॉटेल मिर्ची, जेल रोडहून नाशिक रोड येथे आला. तेथे त्याने स्वप्निलला घरी जाण्यासाठी गाडीतून उतरवले आणि पुढे सिन्नरच्या दिशेने जात असतांना गाडीत असलेला चिमुकला रामजी विशालला म्हणाला की, ‘तुमने उस आदमी को चाकू लगा के मोबाईल और पैसा निकाला, ऐसा क्यूँ किया? मैं सब बता दूँगा|’ त्याचे हे बोलणे ऐकताच विशाल त्याच्यावर चिडला. रामजीमुळे आपल्या लुटमारीचे बिंग फुटेल अशी त्याला भीती वाटू लागल्याने विशालने रामजीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

आपण केलेल्या लुटीची माहिती रामजी आपल्या घरी सांगणार म्हटल्याने याचा कसा बंदोबस्त करायचा याचे विचारचक्र त्याच्या डोक्यात सुरू झाले. नायगाव रोडने जातांना रस्त्यातच थांबून विशालने क्रूरपणे व निर्दयीपणे गाडीतील टॉवेलने चिमुकल्या रामजीचा जोरात गळा आवळून त्याचा खून केला. बिचार्‍या रामजीने हात-पाय झटकतच जीव सोडला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सिन्नर तालुुक्यातील डुबेर गावाच्या शिवारातील निर्जनस्थळी येवून तेथे त्याचा मृतदेह टाकून पळून गेला. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास विशाल नाशिक रोड येथे स्वप्निलच्या घरी आला आणि त्याला बाहेर जेवायला चल असा आग्रह धरला, मात्र त्याच्यासोबत जाण्यास त्याने नकार दिल्याने तो रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरी परतला.

रात्री उशीरापर्यंत रामजी घरी आला नाही म्हणून त्याचे आई-वडील अस्वस्थ झाले होते. ते विशाल घरी येण्याची वाट पहात होते, कारण रामजी हा दुपारपासून त्याच्यासोबतच गेला होता. विशाल घरी येताच रामजीच्या आई-वडीलांना हायसे वाटले. रामजी घरी आला असे त्यांना वाटले, पण गाडीतून विशाल एकटाच उतरल्याचे पाहून त्यांनी रामजीची चौकशी केली. तेव्हा विशालने त्यांना सांगितले की, रामजीला आपण रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गाडेकर मळ्यातील मंदिरात सोडले होते अशी थाप मारली. तो अजून घरी आला नाही का, असे उलट तोच रामजीच्या आई-वडीलांना विचारू लागला. यामुळे त्यांच्यात वाद, भानगड सुरू झाली. त्यांचा आरडाओरडा ऐकून रात्री गस्तीवरील नाशिक रोड पोलीस पथकाने गाडी थांबवली. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता रामजी नावाचा लहान मुलगा बेपत्ता झाला असून तो दुपारपासून विशालबरोबर गेल्याचे समजले, शिवाय रामजीच्या आई-वडीलांनी त्याच्यावरच संशय घेतल्याने पोलिसांनी त्याला गाडीत टाकून पोलीस ठाण्याला आणले.

रामजी दुपारपासून घराबाहेर पडला होता, त्यामुळे तो घरी आला नसल्याचे समजल्यावर त्याचे वडील लालबाबू यांनी रामजीच्या शाळेत व नातेवाईकांकडे जावून, शेजार्‍या-पाजार्‍यांकडे चौकशी करून त्याचा शोध घेतला, मात्र रामजी कुठेच मिळून आला नाही. त्यांना विशालचीच आशा होती, ती पण फोल ठरल्यामुळे त्याला पोलीस ठाण्याला आणण्यात आले होते.

पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली आदींनी विशालकडे रामजीबाबत चौकशी केली असता तो ताकास सूर लागू देईना. उलट-सुलट व उडवा-उडवीची उत्तरे देवून केलेल्या गुन्ह्याची माहिती लपवू लागला. पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवल्यावर मात्र त्याने गुन्ह्याची कबुली दिली, शिवाय आपल्यासोबत असलेला मित्र स्वप्निल सोनवणे याची पण माहिती दिली.

पोलिसांनी लगेच नाशिक रोडला जावून स्वप्निल सोनवणे यास ताब्यात घेवून पोलीस ठाण्याला आणले. रामजी रात्र उशीरापर्यंत आमच्यासोबत होता. सिन्नरला जाण्यासाठी आमच्या गाडीत एक प्रवासी बसला होता. त्याला चाकूने वार करून त्याचा मोबाईल फोन व चार हजार रूपये लुटले होते अशी माहिती सांगत आमच्यासोबत रामजी पण होता अशी कबुली स्वप्निलने दिली. रामजीचा खून करून मृतदेह डुबेरे गावाच्या परिसरात टाकून माघारी परतलेल्या विशालने लगेच स्वप्निलचे घर गाठले. त्याला ‘बाहेर जेवायला चल’ असा आग्रह केला, मात्र घाबरलेल्या स्वप्निलने नकार दिल्याने विशालचा नाईलाज झाला. स्वप्निल त्याच्यासोबत गेला असता तर विशालने त्याचाही काटा काढला असता अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

पोलीस खाक्या दाखवल्यानंतर विशाल पोपटासारखा बोलू लागला. त्याने सांगितले की लिफ्ट देवून आमच्या कारमध्ये बसवलेल्या सिन्नरच्या प्रवाशाला चाकूने मारून त्याच्याकडून लुटलेला मोबाईल व पैशांची माहिती मी घरी आई-वडीलांना सांगेन असे रामजी म्हणाला, त्यामुळे आपले बिंग फुटेल या भीतीने मी घाबरलो आणि सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावाजवळ नेवून टॉवेलने त्याचा गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह डुबेरे येथील स्मशान भूमीजवळील नदीपात्रात फेकून दिल्याची माहिती विशालने देताच रामजीचे आई-वडील ओक्साबोक्सी रडू लागले.

विशालला सोबत घेवून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावाच्या स्मशान भूमीजवळील नदीपात्रात रामजीचा मृतदेह पडलेला होता. त्याच्या गळ्यावर गळफास दिल्याचे व्रण होते. एका निरागस बालकाचा क्रूरपणे खून करण्यात आल्याने पोलिसांचे मनही हेलावले. पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवला. आपण केलेल्या लुटीची वाच्यता रामजी करेल अशी भीती वाटल्याने विशाल या नराधमाने त्याला ठार मारल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी लालबाबू यादव याने दिलेल्या फिर्यादीवरून रामजीचे अपहरण करून त्याचा गळा दाबून खून केल्याचा गुन्हा विशाल गेजगे या नराधमाविरोधात दाखल केला, तसेच प्रवासी विजय आव्हाड याच्या फिर्यादीवरून विशाल गेजगे व त्याचा मित्र स्वप्निल सोनावणे या दोघांविरोधात मोबाईल व चार हजार रूपये लुटल्याचा आणखी दुसरा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून गजाआड केले.

पोलीस आयुक्त दिपक पाण्डयेय यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त समीर शेख, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी फिर्याद दाखल होताच अवघ्या दोन तासांत तपासाचे काम हाती घेतल्यानंतर या बालकाचा खून झाल्याचे उघड झाले. परप्रांतीय नागरिकांनी पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांची भेट घेवून आरोपीला कठोर शिक्षा लवकर व्हावी अशी मागणी केली.

ना.मो.नाशिककर

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!