पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

दारूमुळे सदाशिवचा भाऊच झाला वैरी! बडबडतो म्हणून त्यांच्या जीव घेतो हरी!

नाशिक

न्यू गोपाल चौक, कामटवाडा गाव, नाशिक येथे सदाशिव दामू निकम आणि त्यांचा परिवार रहातो. त्यांना दोन मुली, तीन मुले आहेत. तसेच त्यांच्या पत्नी अंजाबाई यांचे निधन झाल्यापासून त्यांची मुलगी बायडी कैलास सुर्यवंशी ही वडीलांकडेच रहाण्यासाठी आली होती, त्यामुळे सदाशिव यांच्या कुटुंबात मोठा मुलगा गोविंद, अण्णा, भारत आणि मुलगी बायडी असे लोक आहेत. बायडी धुणे-भांड्याचे काम करते, तर तिचे भाऊ मोलमजुरीचे काम करतात. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात.

सदाशिव दामू निकम यांना दारूचे व्यसन होते. दारू पिवून आल्यानंतर त्यांना बडबड करण्याची सवय होती. त्यांच्या घराशेजारीच त्यांचा लहान भाऊ हरी दामू निकम हा रहातो. मोठा भाऊ सदाशिव हा दारू पिवून येतो आणि घराबाहेर बसून विनाकारण शिवीगाळ व बडबड करतो हे हरीला सहन होत नव्हते. त्या कारणावरून दोघा भावांमध्ये सतत वाद व भानगडी व्हायच्या. सदाशिवच्या या वागण्यामुळे हरी त्याच्यावर चिडून होता.

घटनेदिवशी सदाशिवने केली शिवीगाळ

दि. 4 मे 2023 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे सदाशिव दारू पिवून घरी आले आणि त्याच्या घरासमोरील रस्त्यावर बसून दारूच्या नशेत मोठमोठ्याने बडबड करू लागले. तो आपल्याला शिवीगाळ करत असल्याचा समज करून घेत हरी हा सदाशिवकडे रागाने धावून गेला आणि ‘तू कोणा-कोणाला शिवीगाळ करतो आहेस, कोणाला तू शिव्या देतो आहेस’ अशी विचारणा करत दमदाटी करू लागला, त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले. सदाशिवची मुलगी बायडी ही त्यांचे भांडण सोडवण्यासाठी पुढे झाली. तिने बापाला सावरून घेत चुलता हरी याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसा हरी हा रागारागात आपल्या घरात निघून गेला. भांडण मिटले असे बायडीला वाटले.

हरीने संतापाच्या भरात केला खून

हरी संतापाने घरी गेला आणि घरातून मोठे लाकूड हातात घेवून आला. त्याने त्या लाकडाने सदाशिववर हल्ला केला. डोक्यावर व इतर भागावर सपासप वार करायला सुरूवात केली. भावावर हल्ला चढवतांना त्याला त्याची दया आली नाही. उलट अतिशय रागात, संतापात, त्वेषाने तो त्याच्यावर तुटून पडला. या क्रूर हल्ल्यात सदाशिवचे डोके फुटले. हाता-पायांवर जखमा झाल्या आणि ते रक्तबंबाळ होवून रस्त्यावर कोसळला. या भांडणाच्या आवाजाने परिसरातील लोक जमा झाले. सदाशिव आणि हरी यांची मुलेही आली. त्यांनी भांडण सोडवले. सदाशिव घायाळ झाल्याचे पाहून बायडीसह तिचा भाऊ व हरीचा मुलगा सचिन अशा सर्वांनी परिसरातील सदाशिव यांना दवाखान्यात नेण्याच्या हालचाली सुरू केल्या. परिसरातील एका तरूणाच्या छोटा हत्ती गाडीतून सदाशिवला जवळच्या खाजगी रूग्णालयात आणले. सदाशिवची मारहाणीमुळे झालेली गंभीर परिस्थिती पाहून डॉक्टरांनी ड्रेसिंग केले आणि त्यांना जिल्हा रूग्णालयात घेवून जाण्याचा सल्ला दिला. सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना सदाशिवचा मृत्यू झाला. हरीने लाकडाने केलेल्या बेदम मारहाणीमुळे घाव वर्मी लागले होते. डोक्यातून व इतर भागातून अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची खबर मिळताच पोलीस उपायुक्त चंद्रशेखर खांडवी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, पोलीस निरीक्षक नईद शेख व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचार्‍यांनी घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा केला. पोलीस निरीक्षक नईद शेख यांच्याकडे गुन्ह्याचा तपास देण्यात आला.

बायडी सुर्यवंशी हिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे काका हरी दामू निकम याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 278/2023 भा.दं.वि. कलम 302 व 504 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. माझे वडील सदाशिव दामू निकम (वय 55) हे दि. 4 मे 2023 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर बसून दारू पिवून बडबड करत असतांना शेजारी रहाणारा काका हरी याने वडीलांना तू मला शिवीगाळ का करतोस अशी कुरापत काढली. भांडण करत त्यांच्या डोक्यात लाकडाने जोरात मारहाण करून जिवे ठार मारले अशी फिर्याद तिने दाखल केली.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हरी दामू निकम (वय 50) यास अटक केली. पोलीस आयुक्त अंकुश जाधव, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नदीम शेख पुढील तपास करत आहेत. सदाशिवच्या पश्‍चात तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडाने प्रहार करून त्याचा निर्घृणपणे खून केला. सख्खा भाऊ पक्का वैरी झाला!

Leave a Comment