पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा इतर बातम्या पानभर-जगभर मनोरंजन सामाजिक हेडलाइन

एका पैशामुळे वाचले 10 हजार

एका पैशालाही फार महत्त्व असते, हे वेळ आल्यानंतरच कळते. ग्रेट नोएडा येथील एका गृहस्थाला एका पैशाचे महत्त्व दाखवून देणारी घटना नुकतीच घडली. त्याच्या खात्यावर केवळ 1 पैसा कमी होता म्हणून त्याचे 10 हजार रूपये भामट्यांना चोरता आले नाहीत. ही माहिती जेंव्हा सायबर सेलला देण्यात आली, तेंव्हा मात्र ऑनलाईन लुट करणार्‍यांचा तपास सुरू झाला.

इंटरनेटचा वापर आणि त्यापाठोपाठ आलेल्या ऑनलाईन व्यवहारामुळे फसवणूकीचे नवे-नवे प्रकारही उघडकीस येऊ लागले आहेत. काही कळण्याआधीच आपल्या बँक खात्यातील पैसे अन्य खात्यावर ट्रान्स्फर होतात, कोणीतरी कोठेतरी रोख पैसे काढतात, कोणीतरी बक्षिसाची आमिष दाखवून पैसे लंपास करतो, असे एक ना अनेक प्रकारे फसवणूक केली जाते. रोज हजारो लोक या ऑनलाईन चोरट्यांची शिकार होत आहेत. ग्रेट नोएडा येथे रहाणारे सुनिल कुमार हे एक व्यावसायिक आहेत. त्याचे बहुतांशी व्यवहार आता ऑनलाईन सुरू आहेत. दि. 2 जून रोजी त्यांनी त्यांच्या एका नातेवाईकास 22 हजार रूपये पाठवले, पण त्यांच्याकडून संबंधित खात्याचा एक क्रमांक चुकला आणि पैसे दुसर्‍याच कोणाच्यातरी खात्यावर जमा झाले. हा प्रकार लक्षात येताच सुनिलकुमार यांनी बँकेशी संपर्क साधला आणि याबाबतची तक्रार नोंदवली, पण बँकेने काही फार लक्ष दिले नाही. साहजिकच सुनिल कुमार यांचे पैसे परत मिळण्यात अडचण निर्माण झाली. संतापलेल्या सुनिलकुमार यांनी तक्रार बँकेच्या अधिकार्‍यांना व्टिटरवर टॅग केली. आता ही तक्रार जगजाहीर झाली. बँकेवर दबाव वाढला हे खरे असले तरी भामट्यांची नजरही या मेसेजवर पडली. त्यासरशी चोरटे अ‍ॅक्टिव्ह झाले. सुनिल कुमार यांना मदत करण्यासाठी एक कॉल आला. त्यांना वाटले हा कॉल बँकेकडूनच आला आहे. त्यांनी संबंधितास सारी माहिती दिली. तसेच एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले, त्याप्रमाणे सुनिल कुमार यांनी ते अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले. नंतर काही वेळातच त्यांच्या खात्यावरून 10 हजार रूपये काढण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्याचा मेसेज सुनिलकुमार यांना आला. त्यानंतर तीन-चार वेळा त्यांना अशाच पध्दतीचा मेसेज आला, त्यावरून स्पष्ट झाले की कोणीतरी त्यांच्या खात्यातून 10 हजार रूपये काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे काम चोरट्यांचे आहे हे लक्षात आल्याने त्यांनी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली. तातडीने त्यांचे बँक खाते सुरक्षित करण्यात आले आणि अधिक तपास सुरू झाला, तेंव्हा निष्पन्न झाले की चोरटे सुनिलकुमार यांच्या खात्यातून 10 हजार रूपये काढण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या खात्यावर 9999.99 रूपये इतकी रक्कम होती. फक्त 1 पैसा कमी असल्याने 10 हजार रूपये ही रक्कम पूर्ण होत नव्हती, त्यामुळे ती काढता येत नव्हती. केवळ एक पैसा कमी होता म्हणून सुनिलकुमार यांचे 10 हजार रूपये वाचले.

Leave a Comment