पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा इतर बातम्या पानभर-जगभर मनोरंजन सामाजिक हेडलाइन

ऑनलाईन खेळ, मुलाने गमावले 39 लाख

पबजी गेमचे विपरीत परिणाम होऊ लागल्याने सरकारने त्यावर बंदी घातली, पण इंटरनेट हे असे माध्यम आहे, की कोणीही कितीही कशावरही बंदी घातली तरी ते पूर्णपणे बंद होणे शक्य नसते. त्यावर काही ना काही पळवाटा, शॉर्टकट काढलेलेच असतात. आताही पबजी या खेळाशी साधर्म्य असणारे खेळ वेगवेगळ्या नावाने सुरूच आहेत. यातील एका ऑनलाईन खेळात एका मुलाने हत्यारे खरेदी केली. या ऑनलाईन खेळातील हत्यारांसाठी त्याने वडीलांच्या बँक खात्यातील तब्बल 39 लाख रूपये खर्च केले.

उत्तरप्रदेशातील आग्रा येथे माजी सैनिक कोतवाल सिंह हे परिवारासह रहातात. त्यांचा मुलगा सध्या इयत्ता दहावीचे शिक्षण घेतो. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये त्याला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल पाहिजे होता. वडीलांनी त्याला अभ्यासासाठी स्मार्टफोन घेऊन दिला. बहुतांशी मुले स्मार्टफोन हाती आला की शिक्षणापेक्षा गेम खेळण्यासाठी आणि व्हीडीओ पहाण्यासाठीच त्याचा जास्त वापर करतात. त्या मुलाचेही तेच झाले. तो व्हीडीओ गेम खेळू लागला. त्याला ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन लागले. तो दिवसभर गेम खेळू लागला. एक-एक स्टेज पार करत तो पुढे सरकत होता. विशिष्ट स्टेजनंतर त्याला खेळण्यासाठी नवीन हत्यारे खरेदी करण्याचा मेसेज आला, त्या मुलाने त्यावर क्लिक केले. त्यानंतर प्रत्येक मेसेजला तो रिप्लाय करत राहिला. अगदी वडीलांचे बँक डिटेल्स देऊन त्याने हत्यारांची खरेदी केली. ही हत्यारे काही खरोखर दिली जात नाहीत, तर ती खेळण्यासाठी ऑनलाईनच असतात, पण पैसे मात्र खरोखर घेतले जातात. एक-दोन रूपये नाही तर तब्बल 39 लाख रूपये त्या मुलाकडून घेण्यात आले. मुलाने वडीलांच्या बँकेचे डिटेल्स दिल्यामुळे त्यांच्या एका खात्यातून 21 लाख आणि दुसर्‍या खात्यातून 18 लाख रूपये ट्रान्स्फर झाले. इतकी मोठी रक्कम ट्रान्स्फर झाल्याने बँकेने तातडीने कोतवाल सिंह यांच्याकडे विचारणा करण्यात आली. हे ऐकून कोतवाल सिंह हबकलेच. त्यांनी जन्मभर राबून जमवलेली पुंजी काही क्षणात गेली होती. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता ही रक्कम सिंगापूर येथील एका कंपनीच्या खात्यावर ट्रान्स्फर झाल्याची माहिती मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोतवाल सिंह यांनी पोलीस ठाणे गाठले. रितसर तक्रार दाखल केली. प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने संबंधित कंपनीला नोटीस काढली, तेंव्हा कंपनीच्या प्रतिनिधींनी पैसे ट्रान्स्फर झाल्याचे मान्य केले, पण कंपनीने दिलेल्या खुलाशात स्पष्ट म्हटले आहे की, कंपनीने तयार केलेल्या गेम्सच्या काही स्टेजवर हत्यारे खरेदी करण्याची सुविधा असावी, त्यासाठी विशिष्ट रक्कम भरावी लागते. त्यासाठी सक्ती केली जात नाही, तर खेळाडू नियम आणि अटी मान्य करून पैसे भरू शकतात. त्यामुळे या प्रकरणात कंपनीची काही चूक नाही. पालकांनीच मुले कोणता खेळ, कसा खेळतात यावर लक्ष ठेवले पाहिजे.

सध्या या कंपनीवर कोणती कायदेशीर कारवाई करता येईल याबाबत मार्गदर्शन घेतले जात आहे. त्याबरोबरच पालकांनी मुलांच्या मोबाईल वापराबाबत लक्ष ठेवले पाहिजे, हे मात्र पुन्हा-पुन्हा सांगितले जात आहे.

Leave a Comment