नागपूर
मानकापूर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे या त्यांच्या हद्दीत उपराष्ट्रपतींचा दौरा असल्याने बंदोबस्तात कर्तव्य बजावत होत्या. त्याचवेळी त्यांना एका महिलेचा फोन आला. हॅलो म्हणताच ती महिला ‘मानकापूर पोलीस थाने को जला डालूँगी। मानकापूर पुलीस ऐसी है, वैसी है।’ असे म्हणत ती ओरडून बोलत असल्याने वानखेडे यांनी तिला आधी हळू आवाजात बोल असे ठणकावून सांगितले. ‘तुमचा नेमका मॅटर काय आहे?’ हे विचारताच ती म्हणाली, ‘2 तारखेला माझी मुलगी जबलपूरला आली असून तिचा फोनही लागत नाही. तिचा काही पत्ताही लागत नाही. तिने पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली असून ‘माझ्या मुलीचा घातपातच झाला’ असा संशय व्यक्त केला.’ हे ऐकून वानखेडे यांनी ‘मुलीचा घातपात होण्याचे कारण काय असू शकते?’ असे विचारले, तेंव्हा मात्र ती काहीच बोलली नाही. ती महिला जबलपूर (राज्य मध्यप्रदेश) शहरात होती, त्यामुळे वानखेडे यांनी जबलपूरवरून नागपूरला या, आणि काय प्रकरण आहे ते सविस्तर सांगा असे सांगितले. वास्तविक पहाता हे प्रकरण या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत नव्हते, तरी कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे? या म्हणीप्रमाणे वानखेडे यांना या प्रकरणाचे ओझे वहावे लागत आहे. नागपूर शहरात चर्चेत असलेले सना खान मर्डर मिस्ट्री उघड झाली ती या महिलेच्या तक्रारीमुळेच. ही महिला सना खानची आई असून ती फिर्यादी आहे. तिनेच सना खानच्या मिसींगची तक्रार मानकापूर पोलीस ठाण्यास दिली होती.