पोलीस टाइम्स
आमच्या विषयी पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सांगली हेडलाइन

वासनेतील अडसराने ज्योतीच्या मनात वाढले कौर्य| प्रियकर रूपेशच्या हातून तिने संपवला मुलगा शौर्य|

सांगली

सहा वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला म्हणून रडत-रडत आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसर्‍या दिवशी त्या मुलाचा मृतदेह घरापासून दूर असणार्‍या विहीरीत सापडला. तो मुलगा इतक्या लांब कसा आला? हे मोठेच कोडे होते. पोलीस तपास करत असतांना त्या मुलाच्या आईचे एका तरूणाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्या तरूणाला ताब्यात घेतले. त्याला बोलते केले, तेंव्हा त्याने सगळा घटनाक्रम सांगितला. या चिमुकल्याचा जीव त्याच्या आईच्या संमतीनेच तिच्या प्रियकराने घेतला होता.

00

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणार्‍या लेंगटे गावात रहाणार्‍या ज्योतीचा जोंधळेवाड येथे रहाणार्‍या प्रकाश लोंढे याच्यासोबत विवाह झाला होता. प्रकाश लोंढे हा मजुरीचे काम करून आपल्या कुुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. या दाम्पत्याला शौर्य (वय 6) नावाचा मुलगाही आहे. गरीब असले पती-पत्नी आनंदात जगत होते, पण ज्योतीच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले आणि संसारात कुरबुरी सुरू झाल्या. आनंदात जगणार्‍या या दाम्पत्यामध्ये कुरबुरी सुरू झाल्या होत्या. हे वाद असह्य झाल्याचे कारण सांगत ज्योतीने मुलाला घेऊन माहेरी लेंगटे येथे जाण्याचा निर्णय घेतला, पण यामागचे कारण काहीतरी वेगळेच होते. ते म्हणजे तिच्या सासरच्या गावचा म्हणजे जोंधळेवाडीतील रूपेश नामदेव घाडगे. त्याच्याबरोबर तिचे अनैतिक संबंध होते. त्या कारणाने  तिचे मन नवर्‍यासोबत संसार करण्यास तयार नव्हते, त्यामुळे ती नवर्‍यावर चिडत होती. भांडत होती. रोजच नवर्‍यासोबत होणार्‍या कटकटी तिने रूपेशला सांगितल्या होत्या. त्यावेळी रूपेशने तिला आधार देण्याचे वचन दिले होते. मग मात्र ज्योती लोंढेने आपल्या मुलाला घेवून माहेर गाठले.

माहेरी गेल्यानंतरही रूपेश आणि ज्योतीचे संबंध संपुष्टात आले नाहीत. उलट मोबाईलद्वारे ते एकमेकांना संपर्क करू लागले होते. अधून-मधून ते एकमेकांना भेटतही असत. या भेटीदरम्यान रूपेश तिला म्हणाला, तू नवर्‍यापासून विभक्त रहातेस. तुला माझ्या प्रेमाची गरज आहे. तुला पतीसारखेच मी प्रेम देत राहीन.असे म्हणत तिला आणखी आपलेसे करण्याचा रूपेशने प्रयत्न केला. त्याच्या या गोड बोलण्याला ज्योती भाळली. आता ज्योती माहेरी गेल्यानंतर तिला कशाचेच बंधन उरले नव्हते, त्यामुळे रूपेशला भेटण्याच्या ओढीने तो बोलवेल तेथे त्याच्या मोटरसायकलवरून जावू लागली. संसार सोडून माहेरी आलेली ज्योती सध्या रूपेशबरोबर  गाडीवरून फिरते. त्या दोघांचे लफडे आहे, हे एव्हाना गावाला कळले होते. गावामध्ये त्या दोघांबद्दल कुजबुज सुरू होती, पण त्याची पर्वा रूपेश आणि ज्योतीला नव्हती, हे सारे प्रकार चोरून, लपून-छपूनच होत होते, त्यामुळे ज्योती एके दिवशी रूपेशला म्हणाली, आपण असं हे लपून-छपून किती दिवस रहायचं. यावर रूपेश तिला म्हणाला, मला तुझ्याशी लग्न तर करायचं हाय, पण तुझा मुलगा… आपल्याला अडचणीत आणू शकतो.’ ज्योती रूपेशच्या बोलण्याचा अर्थ कळला. तो आपल्या पोटच्या मुलाला अडसर म्हणतो आहे आणि त्याला ठार मारण्याचे सुचवत आहे. हे तिच्या लक्षात आले.  तिने रूपेशला दुजोरा दिला. ती मुलाला संपवण्यास तयार झाली.

छोट्या शौर्यला ठार मारण्याचे त्या दोघांनी ठरवले. शनिवार दि. 6 मे 2023 चा दिवस. त्यादिवशी लेंगटे गावी ठरल्याप्रमाणे रूपेश घाडगे आला. त्यावेळी शौर्य हा घराबाहेरच होता. त्याला रूपेशने आपल्याजवळ बोलावून घेतले आणि गाडीवर बसवून तो त्याला घेवून गेला. गाडीवरून जातांना रूपेश हा निर्मनुष्य ठिकाण पहातच चालला होता. एका ठिकाणी त्याला निर्जन ठिकाण दिसले. त्याठिकाणी एक विहीर होती. या विहीरीतच शौर्यला टाकून देण्याचे ठरवले. रूपेशने गाडी थांबवली. शौर्यला खाली उतरवले. त्याला घेवून तो विहीरीजवळ आला. त्याला विहीरीत टाकण्याआधी त्याने आजूबाजूला पाहिले आणि कोणी नसल्याची खात्री करत त्याने शौर्यला त्या विहीरीत टाकून दिले. गटांगळ्या खात शौर्य थोड्याच वेळात बुडाला. इकडे शौर्यला विहीरीत टाकताच ओरडणार्‍या शौर्यकडे दुर्लक्ष करत रूपेशने घाई-घाईने आपल्या गाडीला किक मारली आणि तो आपल्या गावी निघून गेला.

इकडे ज्योतीने शौर्य दिसत नसल्याचा कांगावा करत विटा पोलीस ठाणे गाठले. तिथे मुलगा शौर्य प्रकाश लोंढे (वय 6) हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. गुन्हा रजि. नं. 363/2023 नुसार ती दाखल झाली होती. त्यानंतर एका विहीरीत शौर्यचा मृतदेह सापडला. घरापासून दूर असलेल्या विहीरीत शौर्यचा मृतदेह सापडल्यामुळे पोलिसांना तसेच आजूबाजूच्या नागरिकांनाही शंका आली. हा मुलगा लहान असल्यामुळे आत्महत्या करू शकत नाही की इतक्या लांब एकटा जावू शकत नाही, मग याचा मृतदेह त्या विहीरीत कसा काय? या प्रश्‍नांची उत्तरे पोलीस शोधू लागले. त्यादृष्टीने त्यांनी गावामध्ये चौकशी केली असता शौर्यची आई ज्योती आणि तिचा प्रियकर रूपेश घाडगेे यांच्याबद्दल माहिती मिळाली. अनैतिक संबंधातून शौर्यचा घातपात झाला असावा अशी शंका पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कण्हेरे यांना आली होती. ती त्यांनी वरीष्ठांसमोर व्यक्त केल्यानुसार उपअधीक्षक पद्मा कदम आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी आपल्या सहकार्‍यांना तपासाच्या सुचना दिल्या. त्यानुसार ज्योती लोंढे आणि रूपेश घाडगे यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला असता दोघांचा बनाव टिकला नाही. त्यांनी शौर्यला विहीरीत फेकल्याचे कबुल केले.

शौर्य प्रकाश लोंढे खून प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. 302 नुसार गुन्हा नोंदवला गेला. दि. 9 मे 2023 रोजी ज्योती प्रकाश लोंढे आणि रूपेश नामदेव घाडगे या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. निव्वळ अनैतिक संबंधात अडसर ठरतो म्हणून आईने प्रियकराच्या मदतीने पोटचा मुलगा शौर्यचा घातपात केला. यामध्ये प्रत्यक्ष रूपेश घाडगे याने शौर्यला विहीरीत फेकून दिले असले तरी यास ज्योती लोंढेची सहमती होतीच.

या खून प्रकरणाचा तपास सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपअधीक्षक पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक पांडुरंग कण्हेरे, हवालदार सचिन खाडे व सहकारी करत आहेत.

Leave a Comment