पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सातारा हेडलाइन

महेंद्र करतो गावात बदनामी हा कयास! म्हणून दिलीपने त्याला लावला फास!

सातारा

माणूस आपल्या नादात जगत असतो, एखाद्या व्यसनाच्या आहारी जाऊन भटकत असतो. तो कोणाला काही बोलला हे माहित नसले तरी एखादे खापर त्याच्या डोक्यावर फोडले जाण्याची शक्यता असते. त्या कारणातून नाहक त्याचा जीवही जाऊ शकतो. तळबीडमध्ये महेंद्र हा मद्यपी नशेत फिरत होता, रात्री देवळात झोपत होता. तो आपली बदनामी करतो अशा संशय दिलीपला आला. या संशयातून त्याने महेंद्रचा जीव घेतला. या घटनेचा हा वृत्तांत.

000

तळबीड हे पुणे-बेंगलोर महामार्गावरील कराडनजिकचे सातारा जिल्ह्यातील एक टुमदार गाव. बागाईत क्षेत्र, हायवेवरील व्यवसाय, ऊसासारखे भरघोस नगदी पिक, त्यातच तासवडे टोल नाका, त्यामुळे व्यस्त समाज, छान उत्पन्न, शिवाय थोड्या-फार इंडस्ट्रीजमुळे सर्व काही छान असलेलं हे गाव. याच गावात महेंद्र शंकर वाघमारे हा 45 वर्षे वयाचाच गृहस्थ होता. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो नेहमी आपल्या कुटुंबापासून दूरच रहात होता. दारू पिल्यानंतर रोज संध्याकाळी तो गावातील एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्याच्या वस्तीवरील गुरांच्या गोठ्यामध्ये झोपत असे.

मंदिरात सापडला मृतदेह

शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजीचा दिवस. त्याच दिवशी मंदिरात देवदर्शनासाठी गेेलेल्या लोकांना महेंद्र वाघमारे याचा खून झाल्याचे समजून आले. ही बाब त्याच्या वडीलांना समजताच ते धावत-पळतच मंदिरात आले. सकाळी साडेआठ वाजता शंकर तुकाराम वाघमारे यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबतची फिर्याद पोलिसांना दिली. त्यावेळी हजर असलेले फौजदार बाकले हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेहाची पहाणी केली. मृतकाच्या पोटावर व छातीवर रक्त दिसल्याने मयताचे कपडे काढून पाहिले असता त्याच्या पोटावर, छातीवर धारदार शस्त्राचे वार दिसले. लगेच याची माहिती वरीष्ठांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर.वरोटे हेही घटनास्थळी आले. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर जमलेल्या लोकांकडून, मयताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली.

दरम्यान पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मयताच्या पोटावर व छातीवर धारदार शस्त्राने वार झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितल्याने हवालदार माने यांनी महेंद्र शंकर वाघमारे याच्या मृत्यूबाबत अज्ञात इसमाविरूद्ध तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 82/2023 भा.दं.वि. कलम 302 प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दाखल केली.

सीसीटीव्ही फुटेज तपासणी

या गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून गावातील लोकांकडे विचारपूस व चौकशी केली. तसेच गावात असलेले सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहून तपास करत असतांना दिलीप मारूती साळुंखे रा. तळबीड हा इसम दि. 28 एप्रिल 2023 रोजी मारूती मंदिराच्याजवळ घुटमळत असतांना लोकांनी पाहिल्याचे तपासात निष्पन्न होवू लागले, त्यानुसार दिलीप मारूती साळुंखे याचा शोध घेण्यास पोलीस पथकाने सुरूवात केली. पोलीस पथकाच्या शोध मोहिमेस यश आले. सायंकाळी सहा वाजता साळुंखेच्या घरात पोलीस फौजदार एस.एम. पिसाळ, ए.बी.ओंबासे, हवालदार एन.एन. विभुते, एस.एम. घटुकडे असे सर्व जण गेले आणि त्याला ताब्यात घेतले.

गैरसमज पसरवत असल्याने केला खून

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की महेंद्र वाघमारे हा गावातील लोकांना त्याच्याबद्दल म्हणजेच दिलीप साळुंखेबद्दल खोटी माहिती देत होता. गैरसमज पसरवत होता. त्याचा राग येवून दिलीप साळुंखे याने महेंद्र वाघमारे रात्री मंदिरात झोपावयास आला, तेंव्हा त्याला याबाबत जाब विचारला, मात्र महेंद्रने त्याला उडवून लावले, म्हणून चिडून जावून मारूती मंदिरात असलेल्या झेंड्याच्या कापडाने दिलीपने प्रथम महेंद्रचा गळा आवळला. नंतर जवळ असलेल्या चाकूने छातीवर, पोटावर वार करून त्याचा खून केला. दिलीप साळुंखे याने कबुली दिल्यानंतर दि. 30 एप्रिल 2023 रोजी त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता दि. 4 मे 2023 रोजीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.

Leave a Comment