पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कथा पानभर-जगभर मनोरंजन विज्ञान कथा / गुढ कथा हेडलाइन

जीवाणू

भाग 2

अविनाश केबीन बाहेर पडला..आणि डॉ. काळे क्षणभर त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात राहिले.

अविनाश… अविनाश देवरे. खेड्यातून आलेला हुशार तरूण, बुटकेलेसा आणि अंगानं चांगलाच भरलेला. प्रथम संशोधन करण्याच्या इच्छेने आलेला, पण नंतर नेट-सेट या परीक्षांचं खुळ डोक्यात घुसल्याने, आयुष्यातील महत्त्वाची दोन ते तीन वर्ष कुठलीही ठोस परिणाम न मिळवता घातलेली. शेवटी डॉ. काळेंनी त्याला एकदा बोलावून समजावलं होतं. आयुष्यातील सुवर्णकाळ वाया घालवू नकोस म्हणून सुचित केलं होतं.. आविनाशनंही त्याचा गांभीर्याने विचार केला होता व नेट-सेट परीक्षांचा नाद सोडून, त्यानं स्वतःला संशोधनात झोकून दिल होतं.

त्याच्या इच्छेनुसार डॉ. काळेंनी पॉलीमर, प्रारणे व प्रतिसुक्ष्म जीवाणूंवरील (रपींळ ाळलीेलळरश्र) संशोधन करण्यास अनुमती दिली होती. कमी शक्तीचा इलेक्ट्रॉन स्त्रोत वापरून त्याला हा अभ्यास करायचा होता. या संशोधनात जोखीम होतीच पण तेवढीच उत्सुकताही होती. त्याला हा संशोधनाचा विषयही मनापासून आवडला होता… आणि त्याचाच पाठपुरावा तो करू लागला होता.

चर्चेनंतर अविनाश कामाला लागला होता. रासायनिक व किरणांच्या सहाय्याने त्याने सोनं व चांदीचे अतिसुक्ष्म कण तयार केले होते, यासाठी उच्च शक्तीचे इलेक्ट्रॉन वापरले होते. पुढे हेच अतिसुक्ष्म कण घेऊन तो, खास जीवाणूंचा अभ्यास करण्यासाठीच्या प्रयोगशाळेत आला होता. या प्रयोगशाळेत जीवाणू व त्यांचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी अद्ययावत यंत्रणा होती. त्याच्या सहाय्याने जीवाणूंचे संवर्धन व नियंत्रण दोन्ही गोष्टींचा अभ्यास करणे शक्य होत होते.

अविनाशने प्रयोगशाळेत येताच एप्रन घालून, हातात ग्लोव्हज् घातले व एका काच तावदानातील चंचूपात्रात पॉलीमरचे नमुने ठेवले. त्यावर प्रचंड प्रमाणात जीवाणूंचे संवर्धन झाले होते.

फोरसेफच्या सहाय्याने, अविनाश एक-एक नमुना उचलून, काचेच्या चंचूपात्रात ठेवू लागला… आणि त्यावर रासायनिक अभिक्रियेच्या सहाय्याने सोनं व चांदीच्या अतिसुक्ष्म कणांचा थर देऊ लागला. वेगवेगळ्या किरणांच्या मात्रेवरील नमुन्यांवर त्याने अतिसुक्ष्म कण घातले आणि पुन्हा ते विशिष्ठ तापमानाला ठेऊन दिले. जीवाणूंचा प्रयोग करणे म्हणजे अतिशय धोकादायक होते, पण विशिष्ठ काळजी घेऊन अविनाश प्रयोग करत असे. त्यात आता तो चांगलाच निष्णात झाला होता. सोनं व चांदीचे कण हे जीवाणूंच्या संवर्धनाला विरोध करतील अशी अपेक्षा अविनाशला होती, कारण हे अतिसुक्ष्म कण प्रति सुक्ष्म जैवके म्हणूनच कार्यरत होती.

अविनाशने रात्रभर ते नमुने विशिष्ठ वातावरणात ठेऊन दिले. दुसर्‍या दिवशी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन मात्रेच्या सर्व नमुन्यांचे इलेक्ट्रॉन स्कॅनिग मायक्रोस्कोपच्या सहाय्याने प्रतिमा घेण्यात आले.. आणि तो हर्षभरीत झाला होता. ते सर्व परिणाम घेऊन अविनाश, डॉ. काळेंच्या केबीनमध्ये दाखल झाला, पण डॉ. काळे तिथे नव्हते. तोपर्यंत सर्व परिणाम त्याने त्यांच्या कॉम्प्युटरवर लोड करून ठेवले आणि तो त्यांची वाट पाहू लागला.

थोड्याच वेळात डॉ. काळे दाखल झाले. खुर्चीत बसत ते म्हणाले, “सॉरी! अविनाश.. अरे एक तातडीची मिटींग होती म्हणून उशीर झाला. बरं काय झालं त्या आपल्या सोनं व चांदीच्या अतिसुक्ष्म कणांचं. प्रयोग केला का?”

“होय!.. सर रात्रीच मी अतिसुक्ष्म कण तयार करून, ज्यावर जीवाणू होते त्या पॉलीमर नमुन्यांवर प्रयोग केला. ते बघा सर परिणाम.” अविनाश त्यांच्या कॉम्प्युटर पडद्याकडे निर्देश करत म्हणाला होता.

स्क्रीनकडे पहाताच डॉ. काळे आश्‍चर्याने पहात राहिले. तुलनेसाठी शेजारीच अतिसुक्ष्म कणांची चिकित्सा न केलेला पॉलीमरचा परिणाम होता. त्यावर लक्षावधी जीवाणू दिसत होते, पण तुलनेने अतिसुक्ष्म कणांची चिकित्सा दिलेल्या पॉलीमरवर कुठेही दिसत नव्हते. फक्त सर्व मात्रांना (ऊेशी) एकच तेवढा जीवाणू शिल्लक होता, म्हणजेच सोनं व चांदीच्या अतिसुक्ष्म कणांनी जीवाणूंना प्रतिबंध घातला होता. डॉ. काळे उत्साहीत होत म्हणाले,

“व्हेरी प्रॉमिसिंग रिझर्ल्ट अविनाश… जवळ-जवळ सर्वच जीवाणू नाहीसे झालेत. याचाच अर्थ इलेक्ट्रॉन आणि अतिसुक्ष्मकणांची चिकित्सा ही खूपच उपयुक्त आहे.”

“सर! पण हा एकमेव जीवाणू दिसतोय. तो का राहिला असावा.” अविनाशने शंका काढली.

“त्याचं काय आहे अविनाश. एखाद्या जीवाणूची प्रतिकार शक्ती सक्षम असावी, त्यामुळेच तो स्वतः सुक्ष्मकणांना जुमानला नसावा, पण तू एक कर. आपल्याला तोही जीवाणू नको आहे. अतिसुक्ष्म कणांचं प्रमाण वाढवून तो प्रतिबंधित होतो का ते बघ.” डॉ. काळेंनी सुचवून पाहिलं.

“ठिक आहे सर!. मी आत्ताच प्रयोग करतो आणि सायंकाळपर्यंत तुम्हाला परिणाम देतो.”

अविनाश केबीन बाहेर पडला व प्रयोगशाळेत शिरला.

अविनाश गेल्यानंतर, डॉ. काळेंनी पुन्हा एकदा ते सर्व परिणाम काळजीपूर्वक पाहिले…आणि त्या एकमेव जीवाणूचं तेथील अस्तित्व त्यांना आश्‍चर्यचकित करत राहिलं.

कुलगुरूंनी पुन्हा तातडीची मिटींग बोलावल्याने डॉ. काळे बाहेर गेले. त्याकाळापुरता त्यांच्या डोक्यातून जीवाणूचा विषय बाजूला पडला होता.

संध्याकाळी डॉ. काळे आल्या-आल्या पुढ्यात अविनाश होता. त्याच्या चेहर्‍यावर चिंता होती. परिणाम दाखवत तो म्हणाला, “सर बघा!…”

आणि डॉ. काळे बघतच राहिले. ते अविनाशकडे पहात म्हणाले,

“काय आहे हे अविनाश ! हा तोच जीवाणू आहे का?”

संध्याकाळी डॉ. काळे आल्या-आल्या पुढ्यात अविनाश होता. त्याच्या चेहर्‍यावर चिंता होती. परिणाम दाखवत तो म्हणाला, “सर बघा!…”

आणि डॉ. काळे बघतच राहिले. ते अविनाशकडे पहात म्हणाले,

“काय आहे हे अविनाश ! हा तोच जीवाणू आहे का?”

“होय सर! तोच आहे. अतिसुक्ष्म कणांचे प्रमाण वाढवल्यानंतर मात्र याचा आकारच बदलला. तो आता सुक्ष्म राहिलाच नाही. ही इज् व्हीजीबल वीथ दी आईज्”

“काय म्हणतोस अविनाश.” डॉ. काळे आश्‍चर्याने उद्गारले.

“होय ! सर… किंबहुना मी त्याला उच्च तापमानालाही ठेवल्यानंतर त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही, उलट तो सशक्तच होत राहिला.” अविनाशच्या स्वरात काळजी होती. त्याने हातातील काचेची पेटी उघडली व त्यातील पॉलीमरचा नमुना दाखवला.

डॉ. काळेंनी डोळे बारीक करून निरीक्षण केलं…आणि तेथे आत त्यांना खरंच वलयांकृत आकृती दिसत होती. त्याचा आकार वाढला होता एवढं निश्‍चितच.

डॉ. काळे क्षणभर काहीच बोलले नाहीत. ते गंभीर झाले होते. त्यांनी इकडं-तिकडं पाहिलं आणि पुन्हा जीवाणूकडे पाहिलं. उगीचच तो वळवळत असल्याचा भास त्यांना झाला. ते स्वतःला सावरत घड्याळात पहात म्हणाले, “अविनाश आता रात्रीचे साडेनऊ वाजलेत. या नमुन्याला काळजीपूर्वक बंदिस्त करून ठेव. मी विचार करतो आणि उद्या आपण काय करायचं ते ठरवू.”

“ठिक आहे सर!” काचेची पेटी पुन्हा बंद करत अविनाशने ती हातात घेतली…आणि तो बाहेर पडला.

डॉ. काळे क्षणभर विचार करत तसेच बसून राहिले. ते हळूच उठले व केबीन बाहेर पडले. दिवसभराच्या धावपळीने त्यांना थकवा आला होता. रात्रीही ते जीवाणूचा विचार करतच झोपले होते.

अविनाश बहुतांशी रात्रीचं उशीरापर्यंत प्रयोगशाळेतच संशोधन करत असे. जेवण झाल्यानंतर त्याने काही प्रयोग केले होते. यातच रात्रीचे बारा वाजून गेले. तो उठला व जीवाणू ठेवला होता, त्या खोलीत शिरला आणि काही काळ तो थरारून गेला. त्याच्या अंगावर रोमाचं उभे राहिले. केसंही सरळ झाले. त्याला कुणीतरी ओढत असल्याची जाणीव झाली. तो सावध झाला आणि निकराने खोली बाहेर पडला.

अविनाश घाबरला होता. त्यानं तातडीने मोबाईल काढला आणि डॉ. काळेंना फोन लावला. पलिकडून आवाज आला.

“एस्”

“सॉरी सर! मी अविनाश. तुम्ही आत्ता यावेळी प्रयोगशाळेत येऊ शकाल?”

“का रे? काय झालं?” डॉ. काळेंचा आळसावलेला स्वर.

“सर! शब्दात सांगणे कठीण आहे.” अविनाशच्या स्वरात अगतिकता होती.

“एनीथिंग सिरीअस?” डॉ. काळे उठत म्हणाले.

“सर! तसं समजा हवं तर, पण तुम्ही या.”

“बरं मी आलोच.” मोबाईल बंद झाला.

अविनाश खोली बाहेरच अगतिकतेने फेर्‍या मारत डॉ. काळेंची वाट पाहू लागला.

डॉ. काळे येताच, अविनाश त्यांच्याकडे झेपावला व म्हणाला,

“सर! इकडे या.” जीवाणू ठेवला होता त्या खोलीकडे निर्देश करतच तो पुढे झाला.

“अरे पण झालं काय?” डॉ. काळेंचा स्वर अर्धवट रहाताच अविनाशने दार उघडलं होतं.

आणि डॉ.काळेंच्या शरीरावरील गात्रं न् गात्रं रोमांचित झाले होते. डोक्यावरील केसं ताठरली गेली होती आणि ते खोलीकडे ओढले जाऊ लागले. प्रसंगावधान पाहून अविनाशने त्यांना बाहेर ओढले.

बाहेर येताच काचेच्या तावदानातून त्यांनी आत पाहिलं. काचेच्या पेटीतील जीवाणू पॉलीमर पिंजर्‍यातून बाहेर पडून काचेच्या पेटीवर अंगविक्षेप करत धडका देत होता. डॉ. काळेही विस्फारलेल्या डोळ्यांनी पहात राहिले. अविनाश म्हणाला,

“सर काय आहे हे? खोलीतील वातावरण?” मध्येच डॉ. काळे त्याला अडवत म्हणाले,

“अविनाश.. जवळपास लोखंडाचा गज किंवा तत्सम धातू असेल तर लवकर आण. मी तुला नंतर सांगतो. गो फास्ट.”

अविनाश क्षणातच एक लोखंडाची भली मोठी तार घेऊन आला. ती काळेंच्या हातात दिली. तारेच्या एका टोकाला रोधक लावून, डॉ. काळेंनी हळूच तार आत सरकवली आणि जीवाणूला स्पर्श होताच खोलीतील वातावरण सैल झाले. डॉ. काळे तातडीने आत शिरले. त्यांच्या पाठोपाठ अविनाशही गेला, पण यावेळी खोलीतील वातावरण सामान्य होतं. डॉ. काळेंनी जीवाणूकडे पाहिलं. तो पुनःश्‍च पॉलीमरच्या पिंजर्‍यात जाऊन बसला होता. अविनाश डॉ. काळेंच्या कृतीने हैराण झाला होता. तो अविश्‍वासाने म्हणाला,

“सर! काय होतं ते?”

“सांगतो मी तुला. मगाशी खोलीतील जे वातावरण तयार झाले होते त्याला हा जीवाणू कारणीभूत आहे. याच्यामुळेच खोलीतील हवा भारांकीत झाली होती, त्यामुळेच आपण ओढले जात होतो.” डॉ. काळेंनी सांगीतलं

“पण तरी हे कशामुळे सर?” अविनाशचा प्रश्‍न.

“अविनाश. हा साधा जीवाणू नाहीये. हा जैव विद्युत घट म्हणूनही कार्यरत होतो. अती उच्च दाब निर्माण करून आजूबाजूची हवाच भारांकीत करून टाकतो.” डॉ. काळेंनी स्पष्टीकरण दिले.

“काय म्हणताय सर! जैव विद्युत घट. हाय व्होल्टेज. अन्बिलीव्हेबल.” अविनाश त्या शांतपणे पहूडलेल्या जीवाणूकडे अविश्‍वासाने पहात राहिला. तो पुढे म्हणाला, “सर पण आता याच काय करायचं?”

“आता तो डिस्चार्ज झालेला आहे. लेट हिम बी अ‍ॅज इट इज. आपल्याला काही तातडीने निर्णय घ्यावे लागतील. आपण उद्या सकाळीच बघू. तोपर्यंत तू किप वॉच हिम. आणि बी केअर फुल.” डॉ. काळेंनी सूचना देऊन काळजी घेण्यास सांगितले.

डॉ. काळे प्रयोगशाळेच्या बाहेर पडले. यावेळी रात्रीचे दोन वाजून गेले होते. पुढे त्यांना झोपच आली नव्हती.

सकाळीच डॉ. काळे हजर झाले होते. अविनाश रात्रभर प्रयोगशाळेतच होता. आल्या-आल्या डॉ. काळे म्हणाले,

“अविनाश ! रात्री काही प्रोग्रेस?”

“सर जीवाणू तसा शांतच होता… आणि खोलीतील वातावरणही सर्व साधारणच होते.” अविनाशने परिस्थिती सांगितली.

“गुड! अविनाश. हा जीवाणू स्वतः उच्च दाब निर्माण करतो आहे. याचाच अर्थ तो सर्वसामान्य नाहीच. खरं तर उर्जेची नितांत गरज असतांना अशा जैविक विद्युत घटांचा उपयोग समाजासाठी चांगला होऊ शकेल, पण त्या आधी जीवाणूची सखोल माहिती आपल्याला घ्यावी लागेल.” डॉ. काळेंनी सांगितलं.

“म्हणजे नेमकं काय करायचं सर?” अविनाशचा प्रश्‍न.

“म्हणजेच याच्या गुणसुत्रांचा अभ्यास करून, त्यातील कुठले डी.एन.ए हे विद्युत घट निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहेत, त्यानुसार या जीवाणूचा उपयोगही  आपल्याला उर्जा निर्मितीसाठी करता येऊ शकेल.” डॉ. काळे आशेने म्हणाले.

“काय? विद्युत घट आणि उर्जा?” अविनाशची प्रश्‍नार्थक मुद्रा.

“होय! अविनाश. निसर्गातील हा चमत्कारच म्हणायला हवा. एखादा जीवाणूच उर्जा निर्माण करतो ही किमयाच आहे.” डॉ. काळेंनी वस्तुस्थिती सांगितली.

“ठिक आहे सर! मी जैव माहितीशास्त्र विभागात जाऊन, डी.एन.ए. मॅपिंग करून घेतो.”

अविनाश बाहेर पडला. यावेळी त्याच्या हातात जीवाणू असलेली काचेची पेटी होती. तो आता कमालीचा स्थिर होता.

दुपारपर्यंत जीवाणूच्या डी.एन.ए मॅपिंगचे रिझर्ल्ट हाती आले होते. अविनाश, डॉ काळेंच्या केबीनमध्ये शिरत म्हणाला,

“सर! हे घ्या. जीवाणूचे डी.एन.ए प्रिंटिंग”

डॉ. काळे जीवाणूचे डी.एन.ए. प्रिंटिंग पहाताच सावरून बसले. इतर जीवाणूंची तुलना करताच मात्र ते आश्‍चर्यचकीत झाले. ते उद्गारले,

“अ‍ॅमेझींग!”

“काय झालं सर?” अविनाशचा उत्सुक स्वर.

“या जीवाणूचे डी.एन.ए. पृथ्वीवरील अस्तित्वात असणार्‍या कुठल्याही जीवाणूशी मिळत नाही. दे आर टोटली डिफरंट.”

“म्हणजे काय सर!” अविनाशची उत्सुकता

“याच अर्थ हा जीवाणू पृथ्वीवरचा नाहीच आहे.” डॉ. काळे विचाराअंती म्हणाले,

“कसं शक्य आहे! ” अविनाश आश्‍चर्यचकीत होत म्हणाला.

“होय!.. शक्य आहे हा कदाचित हा अवकाशातून आला असावा किंबहुना दुसर्‍या ग्रहावरीलसुद्धा असावा.” डॉ. काळे म्हणाले.

“सर! मग आता काय करायचं?” अविनाशचा चिंतीत स्वर.

“ हा जैव विद्युतघट आपल्याला उपयुक्त असला तरी तो परकीय आहे. त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. त्याला नष्ट करणे उत्तम.” डॉ. काळे निर्णायक बोलले.

“काय? नष्ट.” अविनाश आश्‍चर्याने उद्गारत पुढे म्हणाला, “पण कसं?”

“मला वाटतं आपण इलेक्ट्रॉन, गॅमा, न्युट्रॉनसारख्या किरणांचा वापर करून त्याला नष्ट करू शकतो..आणि हे लवकरात लवकर करण्याची गरज आहे, कारण तो अजून काही उपद्रव करण्याअगोदर आपल्याला मार्ग काढावा लागले.” डॉ. काळे निर्णायक म्हणाले.

“सर मला वाटतं, आत्ताच आपण सुरूवात करू यात.” अविनाश तातडीने म्हणाला.

“ठिक आहे, प्रवेगक आणि जनित्रे चालूच आहेत. चल.” दोघेही उठले होते. जीवाणूला सोबत घेऊन ते प्रवेगकांच्या खोलीत आले…आणि प्रयोगाला सुरूवात केली होती.

दोघेही काळजीपूर्वक जीवाणू हाताळत होते. उच्च शक्तीचे इलेक्ट्रॉन व गॅमा किरणांचा काहीच परिणाम जीवाणूवर झाला नव्हता, म्हणून ते दोघे न्युट्रॉन प्रज्वलीत करण्यासाठी न्युट्रॉन जनित्र खोलीत दाखल झाले.

न्युट्रॉन्सचा मारा करताच मात्र त्याच्यात कमालीचे बदल होऊन, त्याच्या अवयवात बदल झाला होता. पॉलीमर जाळ्यातनं बाहेर पडून, पूर्ण प्रयोगशाळेत त्याने संचार केला होता. डॉ. काळे व अविनाश अचंबित झाले होते. न्युट्रॉन्सचा त्याच्यावर परिणाम होताच त्याच्यातील चलता कमालीची वाढली होती आणि तो जास्तच हिंसक होऊ पहात होता म्हणून डॉ. काळेंनी न्युट्रॉन्सची मात्रा क्षणभर वाढवून बंद केली होती. त्याच क्षणी जीवाणूचा आकार कमी होऊन खाली कोसळला होता.

तो जीवाणू आता निश्‍चल होता. अविनाशने त्याला फोरसेफ सहाय्याने काचेच्या पेटीत बंदीस्त केले आणि डॉ. काळेंना म्हणाला,

“सर आता काय करायचं?”

“अविनाश… मला वाटतं हा जीवाणू खूपच धोकादायक आहे. कुठल्याही विघातक किरणांना तो जुमानत नाही. किंबहुना तो अधिकच उर्जा घेऊन स्वतः सशक्त होत आहे. त्याचा मगाशीचा आकार पाहिलास. प्रचंड मोठा होता. न्युट्रॉनमुळे तो जास्त क्रियाशील होतोय, एवढे मात्र निश्‍चित. एक काम कर.”

“कुठलं सर!”

“ दहा मीटर खड्डा खणून त्यात ही जीवाणूची पेटी त्याचासकट पुरून टाक. जेणेकरून त्याच्यापर्यंत कुठलेही प्रारणे अथवा किरणे पोहचणार नाहीत, कारण ही प्रारणेच खर्‍या अर्थाने त्याची उर्जा आहे.” डॉ. काळे जीवाणूकडे पहात म्हणाले.

“ठिक आहे सर!.. मी हे काम आत्ताच करतो.”

पेटी हातात घेऊन अविनाश बाहेर पडला आणि दोन तासातच तो पुन्हा प्रयोगशाळेत आला होता. डॉ. काळे त्याला म्हणाले,

“अविनाश. तू छान काम केलसं. हा जीवाणू परग्रहावरचाच होता आणि तो विशिष्ठ हेतूनेच येथे आला होता. यात शंका नाही. त्याच्या अतिक्रियेशिलतेमुळे आपण त्याचा जास्त अभ्यास करू शकलो नाही, पण यापुढे याचं मुळ आपल्याला मात्र शोधावं लागेल.”

क्षणभर दोघेही निवांत झाले… डॉ. काळे हुश्श करत खुर्चीत स्थिरावले. तेवढ्यात टेबलावर अविनाशला काहीतरी वळवळतांना दिसले…आणि तो विस्फारलेल्या डोळ्यांनी ओरडला,

“सर! हे पहा…”

डॉ. काळेंचंही टेबलावर लक्ष जाताच तेही सावरून बसले व पहातच राहिले. टेबलावर तो जीवाणू पुन्हा आला होता… आणि अंगविक्षेप करून तो डॉ. काळे व अविनाश यांना आव्हान देण्याच्या पावित्र्यात होता. दोघेही स्तिमीत होऊन पहात राहिले.

त्याचवेळी दोघांचंही लक्ष कॉम्प्युटर पडद्यावर गेलं… तेथे जीवाणूची प्रतिमा अवतरली होती. तीही टेबलावरील जीवाणूप्रमाणेच अंगविक्षेप करतांना पाहून दोघेही हवालदिल झाले. गर्भगळीत झाले, कारण जीवाणूचं अस्तित्व अजूनही नष्ट झालेलं नव्हतं. डॉ. काळे व अविनाश स्थिर व शून्यवत झाले. त्यांच्या हालचालीचं बंद झाल्या होत्या.

समाप्त

Leave a Comment