पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सोलापूर हेडलाइन

आईच्या श्राध्द घातले, वाद खर्चावेळी! मीरालालने घेतला भाऊ सैफनचा बळी!

सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजरवाडी येथील रहिवासी नाजबी गुडूभाई नदाफ (वय 72) हिचे वृद्धापकाळाने एक वर्षापूर्वी निधन झाले होते. नाजबी यांना मीरालाल व सैफन अशी दोन मुले आहेत. दोघांचे विवाह झाले असून ते दोघेही संसार करत आहेत. आई नाजबी हिचे निधन होवून एक वर्ष झाल्याने दोघा भावांनी आईच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला, यासाठी पै-पाहुण्यांना भोजनाचे निमंत्रण देण्यात आले. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भोजन तयार करण्यासाठी भाड्याने भांडी आणण्यात आली होती. त्याचे पाचशे रूपये भाडे झाले होते.

लहान भाऊ सैफन नदाफ याची परिस्थिती गरीब असल्याने भांडी परत देतांना पाचशे रूपये द्यावे लागणार, मात्र एवढी रक्कम त्याच्याकडे नसल्याने त्याने मोठा भाऊ मीरालाल याच्याकडे जावून, ‘भांडी परत करावयाची आहेत. पाचशे रूपये दे’अशी मागणी केली. तेंव्हा मीरालाल याला राग आला. ‘मी पैसे देणार नाही’ असे त्याने सांगितले. तेंव्हा सैफन याने त्याला विनंती केली, ‘भावा माझ्याकडे पैसे नाहीत. भांडी वेळेत परत केली नाहीतर पुन्हा भाडे वाढेल, तरी तू पैसे दे.’ पण पैसे देण्याऐवजी मीरालालने सैफन यास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. सैफन तरीही आपली अडचण त्याला शांतपणे सांगून भाड्याचे पैसे मागत होता, पण मीरालाल त्याचे न ऐकता शिवीगाळ करत होता. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. तो वाद ऐकून मीरालालची मुले रफिक, सलीम आणि मीरालालची पत्नी झामतबी हे तिघे पळत आले. त्यांनी सैफन यास शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. लाथा-बुक्क्यांनी, सळईने मारहाण होत असल्याने सैफन जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून सैफनची पत्नी सैनानजी व त्याचा मुलगा भांडण सोडवण्यासाठी पळत आले. ती येताच तिलाही शिवीगाळ व सळईने पायावर मारहाण करून जखमी केले, नंतर सैफनच्या डोक्यात मोठा दगड घालण्यात आला आणि तो खाली पडताच सगळे पळून गेेले.

मारहाणीमुळे सैफन गंभीर जखमी झाला होता. दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. सैफन याची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले. या प्रकरणी सैफनची पत्नी सैनानजी हिने सैफन यास मीरालाल नदाफ, रफीक नदाफ, सलीम नदाफ, झामतबी नदाफ यांनी मारहाण केल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात वरील चौघांविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 368/2022 भा.दं.वि. 307 प्रमाणे वरील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. सैफन याच्यावर उपचार सुरू असतांनाच जबर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यामुळे पोलिसांनी गुन्ह्यात दाखल केलेल्या कलमामध्ये 302 ने वाढ केली. सैफनचा खून केला म्हणून सैफनचा मोठा भाऊ मीरालाल गुडूभाई नदाफ (वय 54), पत्नी झामतबी मीरालाल नदाफ (वय 51), मुलगा रफीक (वय 28), सलीम (वय 24, सर्व जण रा. पिंजरवाडी, ता. द. सोलापूर) या चौघांवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

Leave a Comment