पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सांगली सामाजिक हेडलाइन

चोरी, दमबाजी, पैसा लुबाडण्याची खेळी पैशासाठी मित्रांनी घेतला मैनुद्दीनचा बळी!

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात खळबळ माजवलेल्या वारणानगर येथील नऊ कोटी रूपयांच्या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी मोहिद्दीन उर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला याचा रमामाता नगर येथील परिसरात रॉकेलवाला समू नदाफ यांच्या बिल्डींगमध्ये निर्घृणपणे खून करण्यात आला. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे हातात हत्यारे घेतलेल्या टोळक्याने पाठलाग करून मैनुद्दीनचा खून केला. थरकाप उडवणार्‍या या घटनेने अनेक प्रश्‍न निर्माण केले आहेत. हा खून आर्थिक व्यवहारातून मैनुद्दीनच्या जीवलग मित्रानेच संगनमताने केल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. पण हे प्रकरण वाटते तितके सरळ नाही, त्यामुळेच पोलीस या प्रकरणाच्या तळापर्यत जात आहेत. लवकरच या हत्येमागचे गुढ उलगडेल, असे पोलीसांनी सांगितले आहे.

०००

मैनुद्दीन मुल्लाचे मूळगाव जाखले, पण तेथे तो क्वचितच जायचा. काही काळ तो पारगाव, ता. हातकणंगले येथे वास्तव्यास होता. त्याला तीन भाऊ व दोन बहीणी आहेत. एक भाऊ रिक्षा ड्रायव्हर आहे, तर बाकीचे दोन भाऊ रोजंदारी करतात. त्याचे सर्व भाऊ विभक्त असून एक बहीण विधवा आहे. गेल्या ८-९ वर्षांपासून मैनुद्दीन हा गावातून बाहेर पडला होता. त्याच्या वडीलांचे १७ वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यानंतर घरची परिस्थिती जेमतेम असल्याने काम-धंदा शोधण्यासाठी तो घरातून बाहेर पडला होता. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी चालक म्हणून काम केले. समोरच्यावर प्रभाव टाकण्याची कला त्याच्याकडे असल्याने अनेकांशी चांगले संबंध निर्माण झाले होते. यातूनच याने आंतरधर्मीय विवाह केला. त्याच्या पत्नीचे नाव निला असे होते, लग्नानंतर ती निलोफर मैनुद्दीन मुल्ला झाली. कोडोली-पारगाव येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये निलोफर परिचारिका आहे. हा विवाह घरच्यांना मान्य नसल्यामुळे घरी येणे-जाणे कमी झाले होते, क्वचितच तो घरी जात असे. तो त्याची मेहुणी रेखा भोरे हिच्या झोपडीवजा घरात रहात होता, तेंव्हा तो सांगलीतील सुयोग मोटर्समध्ये बंद पडलेल्या गाड्या क्रेनने ओढून आणण्याचे काम करत होता. अचानक त्यांच्याकडे भरपूर पैसे आले, त्याने दोन नवीन बुलेटही खरेदी केल्या होत्या, शिवाय महागडे कपडे, दागिने, शूज वापरण्यास सुरू केले होते. एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करणार्‍या मैनुद्दीनच्या रहाणीमानात झालेला बदल, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले, त्यावेळी त्याच्या पँटच्या खिशात सव्वा लाख रूपये सापडले होते. मग मात्र पोलीस यंत्रणा हडबडली.

कुठे काम करत नाही, कुठे नोकरी नाही, कुठे धंदा नाही, तरीही एक बेकार तरूण नवी करकरीत बुलेट गाडी घेतो, खिशात लाखभर रूपये घेवून फिरतो. असा विचार करणार्‍या तपास अधिकार्‍यांनी मग मैनुद्दीनची कुंडली तयार केली. मैनुद्दीन हा काही साधा-सरळ तरूण नाही. तो गुन्हेगार आहे. काही पोलीस ठाण्यात त्याच्यावर गाड्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहितीही पुढे येवू लागल्यानंतर पोलिसांनी तो रहात असलेले बेथलहेमनगरमधील त्याचे घर गाठले. हे घर त्याच्या मेहुणीचे होते.

पोलिसांनी त्या घराची झडती सुरू केली. घरात मोठ्या चार-पाच बॅगा दिसल्या. एवढ्या मोठ्या बॅगा सर्वसामान्य कुटुंबाच्या घरात कशा काय? असा प्रश्‍न तपास अधिकार्‍यांना पडला. त्या बॅगांना हात घालताच मैनुद्दीनच्या चेहर्‍यावरील पाणीच पळाले. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला, मात्र पोलिसांचे डोळे विस्फारले. प्रत्येक बॅग उघडून बघितली व पोलिसांना आश्‍चर्याचे धक्क्यावर धक्के बसू लागले. आपण कुठल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या स्ट्रॉंगरूममध्ये तर नाही ना! असेच पोलिसांना क्षणभर वाटले, कारण त्या घरात पोलिसांना चलनी नोटांचा खजिनाच सापडला. एक-दोन लाख रूपये नव्हे तर तब्बल तीन कोटी रूपयांहून अधिक रक्कम या झडतीत पोलिसांना मिळाली होती.

मैनुद्दीन मुल्ला याच्यावर दुचाकी वाहन चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत. याचा अर्थ तो गुन्हेगार आहे. त्याने एवढी मोठी रक्कम कोठून मिळवली? या प्रश्‍नाचे उत्तर पोलिसांना आता शोधायचे होतेे. कोल्हापूर, सांगली, चिकोडी, निपाणी, बेळगाव वगैरे भागात एवढ्या मोठ्या रक्कमेवर कोणीतरी डल्ला मारला आहे हे कोणत्याही पोलीस ठाण्यात माहित नाही. तसा गुन्हा कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंद नाही, त्यामुळेच या प्रचंड रक्कमेचे गूढ वाढले होते. मैनुद्दीनसारख्या भुरट्या गुन्हेगाराकडे एवढी रक्कम कोठून आली? याबद्दल पोलीसच चक्रावून गेले होते. सापडलेल्या नोटांच्या बंडलांवर वारणा सहकारी बँकेचे सील होते, त्यामुळे या रक्कमेचे गूढ आणखी वाढले होते. त्यातच ही रक्कम कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंजार माधवराव सरनोबत यांची असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी शेतजमीन विकत घेण्याचा मोठा व्यवहार करण्यासाठी ही रक्कम जमा केली होती. त्यांना काही कामानिमित्त परगावी जायचे होते, त्यामुळे ही रक्कम सुरक्षित रहाण्यासाठी वारणा शिक्षण संस्थेचे सचिव असलेले जी.डी. पाटील यांच्याकडे ठेवण्यास दिली होती. झुंझार सरनोबत हे पाटील यांच्या मुलाचे साडू आहेत. पाटील हे वारणा विभाग शिक्षण विभागाच्या शिक्षक निवासी संकुलात रहातात. याच संकुलामध्ये सरनोबत यांनी रक्कम ठेवली होती. चार कोटीपेक्षा अधिक ही रक्कम होती, पण मैनुद्दीन मुल्लाला सर्व रक्कम नेणे जमले नाही. पोलिसांनी बुधवारी वारणा उद्योग समुह परिसरात येवून संबंधित निवासी संकुलाची झडती घेतली, तेंव्हा तेथे आणखी सव्वा कोटी रूपये आढळून आले.

हे प्रकरण असे नोंद झाले, मोहिद्दीन उर्फ मैनुद्दीन मुल्ला हा वारणानगर येथे शिक्षक कॉलनीत रहात होता. तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याने पाळत ठेवून झुंझार सरनोबत यांचा बंगला फोडून कोट्यावधीची रक्कम चोरून नेली होती. त्यानंतर तो सांगली एका ड्रायव्हींग स्कूलवर हंगामी ड्रायव्हर म्हणून काम करण्याचे नाटक करू लागला. त्याने एकाच वेळी दोन नवीन करकरीत बुलेट घेतल्या. त्यातील एक गाडी नदाफ या पोलिसास दिली होती. त्यानंतर ही खबर मिळाल्याने सांगली स्थानिक गुन्हे असलेल्या पोलीस दिपक पाटील यांनी वरीष्ठांना माहिती दिली. तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ घनवटसह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांनी मोहिद्दीन उर्फ मैनुद्दीन मुल्ला यास अटक करून माहिती घेतली. हा सारा प्रवास बेथेलनगर ते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग ते आष्टामार्गे वारणानगर येथे झाला. तेथे पुन्हा छापेमारी झाली व पुन्हा तेथून मोठ्या प्रमाणावर कोट्यवधीची रक्कम आणली. सारा तपास वादग्रस्त ठरला होता.

सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांनी या सार्‍या प्रकाराबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्याकडे रितसर तक्रार केली. त्याचा तपास कोल्हापूरचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केला. सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेवून तपासाचे सारे श्रेय घेणार्‍या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचा पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे, हवालदार शंकर पाटील, शरद कुरळपकर, दिपक पाटील, रविंद्र पाटील, कुलदीप कांबळेसह १६ पोलिसांची चौकशी सुरू झाली होती. त्यावेळी चौकशीत उद्धटपणा करतांना एका अधिकार्‍याने श्रीमुखात मार खाल्ला होता. त्यानंतर तपासी अप्पर पोलीस अधीक्षकांनी योग्य तो अहवाल देताच कोल्हापूर सीआयडी (राज्य गुन्हे अन्वेषण) ने वरील पोलिसांवर गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. गुन्ह्याचा तपास करणारे पथकच आरोपी बनण्याची वेळ आली होती.

मैनुद्दीन मुल्ला यास सीआयडीने अटक केली. त्यानंतर त्याने सीआयडीसमोर विश्‍वनाथ घनवट, सुरज चंदनशिवे, दिपक पाटील, शंकर पाटील, शरद कुरळपकर, कुलदीप कांबळे यांची नावे घेतली. क्रमाक्रमाने सर्वांना अटक करण्यात आली. पन्हाळा न्यायालयाने सर्वांना पोलीस कोठडी दिली. त्यानंतर सर्वांचा मुक्काम कोल्हापूर येथील बिंदू चौक सबजेलमध्ये काही वर्षे होता. वैद्यकीय कारणामुळे तपासी पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट यास जामीन मिळाला आहे.

मोहिद्दीन उर्फ मैनुद्दीन मुल्ला याचाही जामीन झाल्यावर त्याने उचापती सुरू केल्या होत्या. नऊ कोटी रूपयातील चोरून ठेवलेली रक्कम त्याने काही विश्‍वासू साथीदारांकडे ठेवली होती. मुळचाच गुन्हेगारी प्रवृत्ती असणारा मोहिद्दीन उर्फ मैनुद्दीन हा उपनगरात रहात होता. त्याने काही दिवसांपूर्वी कुपवाड एम.आय.डी.सी.च्या प्रभारी अधिकार्‍यास हाताशी धरून बेकायदा जुगार क्लब सुरू केला, त्यानंतर थोड्याच दिवसात विशेष पोलीस पथकाने छापा मारला व त्याचा क्लब बंद पडला. त्यानंतर मैनुद्दीन व साथीदारात बिनसले.

आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्याच्या नादात त्याने सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा शिरकाव सुरू केला. त्याने त्यादृष्टीने कलेक्शनवाल्याशी संधान साधण्याचा प्रयत्नही केला होता. गणेशनगर, रमामातानगर, शामरावनगर, १०० फुटी परिसरात त्याने चाचपणीदेखील केली होती. साथीदार रवि चंडाळे याच्या मदतीने त्याने डाव पणास लावला होता. मोहिद्दीन तसा तापट स्वभावाचा होता. त्या स्वभावामुळे त्याचे साथीदार चिडले असावेत. त्यातून संघर्ष ईरेला पेटला. दि. २९ जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास मैनुद्दीन हा रमामातानगर परिसरात आला होता, तेंव्हा अचानकपणे चार-पाच जणांचे टोळके हातात हत्यारे घेऊन त्याच्यावर चालून आले. रात्रीच्या काळोखात हल्ला झालेल्याने मैनुद्दीनचे धाबे दणाणले. तो जीव वाचवण्यासाठी पळू लागला. तसे हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला. तो पुढे जीवाच्या आकांताने पळत होता, तर त्याच्या पाठलाग करत मारेकरी धावत होते. एखाद्या गुन्हेगारी चित्रपटातील दृश्याप्रमाणे सुरू असलेल्या या प्रकाराने रस्त्यावरील लोकांनी भीतीने पळ काढला. त्या परिसरातील लोकांनी दुकाने, घरांचे दारे बंद करून घेतली. मैनुद्दीन जीव वाचवण्यासाठी मटका किंग पठाण याच्या अड्ड्यालगत असणार्‍या समु नदाफ यांच्या बिल्डींगमध्ये शिरला, पण कोणीही दार उघडले नाही. तो जिन्यातच सापडला. पुढे जाता येत नव्हते, मागे हल्लेखोर होता. तो चांगलाच अडकला. तेथेच हल्लेखोरांनी त्याला गाठले आणि धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. अत्यंत त्वेषाने ते टोळके त्याच्यावर तुटून पडले होते. हल्लेखोरांनी डोके, गळा, मान व पाठीत शरीरावर कोयत्याचे घणाघाती घाव घातले. मैनुद्दीन जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होता, पण त्याच्या मदतीला कोणीही धावले नाही. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्लेखोर तिथून पसार झाले. तडङ्गडणार्‍या मैनुद्दीनचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला. ही माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मैनुद्दीन ठार झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळी कोयता पडला होता, शिवाय तिथून थोड्या लांब अंतरावर दोन मोटरसायकली आढळून आल्या. उपअधीक्षक अजित टिके यांनी तपासकामी मोलाच्या सुचना केल्या आहेत.मैनुद्दीन मुल्ला खून प्रकरणाबाबत सांगली पोलिसांनी संयुक्त पथके स्थापन केली असून सहा आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील पहिला संशयित रवि हरि चंडाळे (वय ३६, रा. शिवाजी मंडई परिसर सांगली) यास सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यापाठोपाठ आणखी तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये शङ्गीक अजमुद्दीन खलिङ्गा (वय ४५, जोतिबा मंदिराजवळ, सांगलीवाडी), नाना उर्ङ्ग बाळासाहेब दादासाहेब पुकळे, (वय ३७, रा. राणाप्रताप चौक, सांगलीवाडी), आप्पा उर्ङ्ग भीमराव मल्लाप्पा वाणी (वय ३६, रा. झाशी कॉलनी, सांगलीवाडी) या तिघांनाही ताब्यात घेतले.

या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली. त्या माहितीनुसार, मैनुद्दीन मुल्ला आणि आप्पा वाणी हे दोघे जीवलग दोस्त होते. ही दोस्ती गुन्हेगारीमुळे झाली होती, हे स्पष्टच होते. मैनुद्दीनला आप्पाने काही पैसे उसने दिले होते. तशी ही रक्कम मोठी होती. मैनुद्दीनकडे भरपूर पैसा आहे, त्याने तो दाबून ठेवला आहे, असे अनेकांना वाटत होते. तसेच आप्पालाही वाटत होते. त्यामुळे तो आपली ठरलेली रक्कम परत करेल, असे त्याला वाटत होते. पण प्रत्यक्षात मैनुद्दीन पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगून त्याने हात झटकले होते. या पैशाचा वाद धूमसत होता. मैनुद्दीन पैसे देत नव्हता. तसेच तो तापट स्वभावाचा असल्याने वाद घालत होता. भांडत होता. त्रास देत होता. कोणताही धंदा करताना मला भागीदार म्हणून घ्या, असा तगादा लावत होता. त्यामुळेही ते त्रासले होते. तो पैसे बुडवणार आणि पुन्हा त्यालाच भागीदार म्हणून घ्यायचे, पैसे देत रहायचे असे किती दिवस चालणार, त्याचा त्रास किती सहन करणार, या विचाराने आप्पा आणि त्याचे साथीदार मैनुद्दीनचा काटा करण्याचा विचार करू लागले. त्याला संपवले तर आपला त्रास वाचेल या विचाराने त्यांनी संगनमत केले. मैनुद्दीनला एका क्लबची जागा पाहण्यासाठी म्हणून बोलवून घेतले. तो मित्रांवर विश्‍वास ठेऊन आला होता, गाङ्गील होता, ही संधी साधून त्यांची त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला.

पोलीसांच्या हाती लागलेली प्राथमिक माहिती अत्यंत कमी आहे. वास्तविक या घटनेमागे अनेक कंगोरे असण्याची शक्यता आहे. आप्पाने मैनुद्दीनला पैसे दिले होते की त्याच्याकडून घेतले होते? कोण कोणाला पैसे परत करण्यासाठी तगादा लावत होते? नेमकी किती रक्कमेचा आर्थिक व्यवहार झाला होता? वारणा घबाडमधील काही रक्कम खरोखरच मैनुद्दीनने लपवली असेल का? आर्थिक व्यवहारातूनच हत्या झाली की आणखी काही कारण होते? अशा अनेक प्रश्‍नांचा गुंता पोलीस सध्या सोडवत आहेत. हा गुंता सुटल्यानंतरच मैनुद्दीनच्या खुनामागचे खरे कारण उघड होणार आहे. सर्वांनाच या घटनेमागचे सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे. 

समु नदाफ यांच्या बिल्डींगमध्ये जिन्याच्या पॅसेजमध्ये खुनाची घटना घडली असून मैनुद्दीन अबुबकर मुल्ला खुनाची फिर्याद त्याच्या पत्नीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. गुन्हा रजि.नं. ५७ /२०२१ भा.दं.वि. ३०२ नुसार अज्ञात आरोपीविरोधात फिर्याद दिली असून सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर व सहकारी तपास करत आहेत.

-किशोर जाधव

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!