पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सातारा सामाजिक हेडलाइन

जयाची पन्नाशी पार, अनंतसाठी उघडले दार. दोघातच घडले काही, चारित्र्यावरही झाले वार.

जीवनाच्या प्रवासात कधीतरी एखाद्याची गाठ पडते. ती व्यक्ति अनोळखी असते, त्यामुळे त्यावर किती विश्‍वास ठेवावा हे ठरवावे लागते. ती व्यक्ती व्यसनी, कामांध, गुन्हेगारी प्रवृत्तीची असेल तर आपल्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. सातारा येथील एका ज्येष्ठ महिलेची हत्या कोल्हापूरातील तरूणाने केली. या दोघांची प्रवासात ओळख झाली होती त्यानंतर तो तिच्या घरी जात असे. त्यांच्यात नेमके काय घडले, हे त्या दोघांनाच माहित आहे. ती तर मरून गेली, तर त्याने ‘ती माझ्यावर अत्याचार करत होती’ असा जबाब दिला. त्याचा जबाब खरा असेल तर तिच्यासारख्या ज्येष्ठ महिलेवर त्याने विश्‍वास ठेऊन चूक केली असे म्हणता येईल, तर दुसरीकडे तिने दाखवलेल्या आपुलकीचा गैरङ्गायदा घेत त्याने तिचा घात केला असेही असू शकतो. सध्या तरी तो जे सांगतो, त्याआधारे तपासाची चक्रे ङ्गिरणार आहेत.

०००

 गेले वर्ष कोरोना महामारीने संपुर्ण जगात थैमान घातल्याने सारेच थंडावले होते, पण हळूहळू लॉकडाऊन संपले जगरहाटी सुरू झाली. ग्रामपंचायत निवडणूकीने तर धुमाकूळच घातला. राज्यभरात  दि. १५ जानेवारी २०२१रोजी मतदान सुरळीत पार पडले. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली होती. सातारा जिल्ह्यातही मतदान शांततेत पार पडले. पोलिसांनी सुटकेचा निश्‍वास सोडला होता, पण दुसर्‍याच दिवशी म्हणजे दि. १६ जानेवारी २०२१ रोजी सकाळीच शहरात खळबळ माजली. कृष्णानगर येथील गजानन सोसायटीमध्ये आदित्य नगरी येथे एका घरामध्ये एक वृध्द महिला मृतावस्थेत पडली असून तिचा खून झाला असावा अशी माहिती पोलिसांपर्यंत पोहचली. पोलीस यंत्रणा सक्रीय झाली. घटनास्थळी पोहचलेल्या पथकाने सारे सोपस्कार पार पाडले.

ही ज्येष्ठ महिला होती, जया गणेश गायकवाड (पाटील). ती या घरात एकटीच रहाण्यास होती. तिच्या पतीचे दहा वर्षापूर्वीच निधन झाले आहे. तिचा मुलगा गेले दीड वर्षापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंद्रे गावात त्याच्या पत्नी आणि मुलांसह रहातो. त्याचा प्लॅस्टीक पाईपचा व्यवसाय आहे. शहरातील या बंगल्यात जया पाटील एकट्याच रहात होत्या. बंगल्याशेजारी सहा भाडोत्री खोल्या आहेत. तिच्या उदरनिर्वाहासाठी एवढे पुरेसे होते. तसेच ती आवड म्हणून छोट्या-मोठ्या मराठी मालिका, वेबसिरीजमध्ये अभिनय करत होती. साहजिकच तिची ओळख अभिनेत्री म्हणून होती. ती शुटींगसाठी काही वेळा परगावी जात असे, पण तिचा खून करण्यामागचे कारण काय? हा प्रश्‍न अनुत्तरीत होता. तिचे कोणाशी काही वैर नव्हते, आर्थिक वाद नव्हता, इतर काही कारणही पोलिसांना सापडत नव्हते. खून झाला हे स्पष्टच असल्याने त्यामागचे रहस्य उलगडणे आवश्यकच होते. सर्व स्तरावर पोलीस यंत्रणा काम करत होती. नातेवाईक, भाडेकरू यांच्याकडून माहिती घेत असतांनाच पोलिसांनी मोबाईल लोकेशन्स, कॉल डिटेल्सचा तपासही केला. यामध्ये जया पाटील यांचे एका मोबाईल क्रमांकाशी वारंवार बोलणे झाल्याचे दिसत होते. घटनेच्या आदल्या दिवशीही त्यांनी त्या मोबाईलवर कॉल केला होता. तो मोबाईल क्रमांक कोणाचा याची माहिती घेतली असता तो क्रमांक विक्रांतनगर येथील अनंत पेढणेकर याचा असल्याने निष्पन्न झाले. पोलिसांनी अनंतला ताब्यात घेतले.

अनंत कोल्हापूरचा तरूण होता, एका हॉटेलमध्ये तो कुक म्हणून काम करत होता. साहजिकच एका सधन घरातील अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या ज्येष्ठ महिलेची एका आचार्‍यांशी कशी काय ओळख झाली. ती त्याला वारंवार का ङ्गोन करत असे. त्यांच्यात काय नाते होते, हे प्रश्‍न होते. या प्रश्‍नांची उत्तरे शोधली तर काही हाती लागण्याची शक्यता होती, त्यामुळेच पोलिसांनी अनंतला ताब्यात घेतले. पोलिसांना समोर पाहून तो गांगरला. त्याने पोलिसांसमोर कानावर हात ठेवले. आपण जया यांना ओळखतच नसल्याचा बनाव त्याने करून पाहिला, पण मोबाईल कॉलमुळे त्याचे खोटे पचले नाही. तो दिशाभूल करत असल्याचे लक्षात आल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला, तेंव्हा मात्र त्याने तोंड उघडले. त्याने जी माहिती सांगितली ती धक्कादायक आहे.

त्या संशयिताने पोलिसांना दिलेल्या माहितीचा आशय असा आहे, माझे नाव अनंत दाजीबा पेढणेकर असून मी मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील न्हावेळी (ता.चंदगड) गावचा आहे. माझ्या घरी आई, वडील, पत्नी व भाऊ असे एकत्र रहातो. सध्या मी सातारा येथील ग्रीनलंड हॉटेलमध्ये कुक (आचारी) म्हणून काम करत आहे. माझे वरचेवर गावी येणे-जाणे असते. सुमारे एक महिन्यापूर्वी मी गावी घरी जाण्यासाठी बॉंबे रेस्टारँट सातारा येथे महामार्गावर उभा होतो. त्यावेळी एक साठ-पासष्ट वर्षीय महिला माझ्या शेजारी उभी होती. तिने मला, ‘कुठे जाणार’ असे विचारले. त्यावेळी मी ‘चंदगडला जाणार आहे’ असे सांगितले असता ती म्हणाली, ‘मी पण कागलला जाणार आहे. बरे झाले, सोबत होईल.’ त्यानंतर बराच वेळ आम्ही उभे होतो. गाडी काही मिळाली नाही. आमच्या इकडच्या-तिकडच्या गप्पा चालू होत्या. मी त्यांना मॅडम या नावाने संबोधत होतो. काही वेळाने एक लक्झरी बस मिळाली, ती गडहिंग्लजपर्यंत जाणार होती. बसमध्ये गर्दी तुफान होती. मी उभाच राहिलो. मॅडमना मात्र क्लिनरच्या मागची सीट मिळवून दिली होती. मी त्यांच्या शेजारीच उभा होतो. गाडीत गर्दी तोबा असल्याचा मॅडम फायदा घेत होत्या. कधी माझ्या पायाला घसपटत होत्या, तर कधी माझ्या मांडीवरून हात फिरवत होत्या. मला ते बरोबर वाटत नव्हते, तरीही मी गाडीत गर्दी असल्याने दुर्लक्ष केले. दोन-सव्वा दोन तासांचा प्रवास करत गाडी कोल्हापूरात पोहचली. थोडी गर्दी कमी झाली. मला मॅडमच्या शेजारी सीट बसण्यास मिळाली. पुढे गप्पा मारत त्यांनी माझी माहिती घेतली. माझा मोबाईल घेवून स्वत:चा नंबर कधी डायल केला, हे मला कळलेच नाही. पुढे गाडी चहा-नाष्ट्यासाठी एका हॉटेलवर थांबली. आम्ही दोघांनीही खाली उतरून नाष्टा केला. त्यावेळीही त्या मला घसटूनच बसल्या होत्या. नाष्टा चहा-पाणी झाल्यावर पुन्हा गाडीत बसलो. चालू गाडीतही त्यांचे माझ्या मांडीवर हात फिरवणे चालूच होते. आता गडहिंग्लज आलो होतो. आम्ही गाडीतून खाली उतरलो, त्यावेळी मॅडम म्हणाल्या की, ‘माझी संध्याकाळपर्यंत शुटींग आहे. पाच वाजता स्टँडवरच भेटू.’

 मग मी माझ्या गावाकडे निघून गेलो. वडीलांची तब्येत बरी नसल्याने मी घरी थांबलो होतो. मॅडमचे फोन अधून मधून येत होते. सुमारे चार-पाच दिवसांनी मी सातार्‍याला आलो. त्यावेळी मॅडमचा फोन आला की, ‘गावावरून आला का नाही? आला असेल तर या आमच्या घरी.’ मीही निवांत होतो. त्यामुळे मी कृष्णानगर, गजानन सोसायटी सातारा येथील मॅडमच्या घरी गेलो. मॅडमनी गप्पा मारत मला स्वत: चहा करून दिला, पुन्हा गप्पा मारत बसलो. त्यावेळी घरी दुसरे कोणी नव्हते, पण काही वेळाने माझे डोके गरगरू लागले. असे वाटत होते की मला झोप येत आहे. मी तिथेच सोफ्यावर काही काळ झोपलो. थोड्या वेळाने उठून निघालो तर मॅडम म्हणाल्या, ‘ठिक आहे, उद्या या. पण येतांना जरा तांदूळ घेवून या.‘ मी हो म्हणालो आणि तिथून बाहेर पडलो, पण माझे डोके कशाने गरगरले हे मी विसरून गेलो. झाले असेल काहीतरी असे समजून मी काही लक्ष दिले नाही. दुसर्‍या दिवशी मी थोडे तांदुळ घेवून मॅडमच्या घरी गेलो, तर तिथे एक तरूण मुलगीही होती. मला वाटले त्यांची मुलगी असेल, तर मॅडमनीच माझी ओळख करून दिली की, ‘ही आमची भाडेकरू आहे. अधून-मधून माझ्याशी गप्पा मारायला येत असते.’ नंतर मॅडमनी मी आणलेल्या तांदळाचा भात करायला टाकला. ‘आता आलाच आहात, तर जेवूनच जा’ असे म्हणत चहा करून दिला. त्यावेळी आम्ही तिघांनीही चहा घेतला. बराच वेळ बोलत बसलो. डायनिंग टेबलवर मी आणि मॅडम जेवलो, पुन्हा गप्पा मारत बसलो. तेंव्हा, ‘आता मी जातो’ असे म्हणत असतांना मॅडमनी पुन्हा चहा स्वत: करून आणला. त्यावेळी ती भाडेकरू तरूणी नव्हती. मी चहा घेतला व निघणार तोच पुन्हा कालचा प्रकार झाला. डोके गरगरणे व झोप येत असल्यामुळे मी तिथेच सोफ्यावर आडवा झालो. थोड्या वेळाने उठलो आणि मी निघून गेलो. मधल्या वेळेत काय घडले की नाही मला माहित नाही, मात्र मला त्या मॅडमच्या चहाची शंका येवू लागली होती. आता बोलावले तरी जायचे नाही असे मनोमन ठाम ठरवलेही होते.

तोच मॅडमचा फोन आला की, ‘उद्या या घरी. तेंव्हा मी नाही म्हणालो, तरी पण त्या, ‘फक्त उद्या ये, बास’ असे म्हणाल्या. मी ‘ठिक आहे’ म्हणालो. नंतर मी पुन्हा मॅडमच्या घरी गेलो. शुक्रवार दि. १५ जानेवारी २०२१ रोजी दुपारची वेळ होती. आजूबाजूच्या गावात मतदानाची घाई चालली होती. मॅडमबरोबर गप्पा मारत असतांना मॅडमनी नेहमीप्रमाणे चहा आणला. चहा प्यायलो, परत तोच प्रकार सुरू झाला. आता मात्र मॅडमनी मला तिच्या बेडरूममध्ये झोपवले होते. माझी झोप लागली. थोड्या वेळाने उठून पहातो तर काय, मॅडम चक्क माझ्या हाताची बोटे चोखत बसली होती. मी हात ओढून घेत असतांना त्या मला स्वत:कडे ओढून घेत होत्या. मी निसटायचा प्रयत्न करत होतो, परंतु अंगात त्राण जाणवत नव्हते. एवढ्यात मॅडमनी हातात कांदा कापायचा चाकू आणला. त्या मला धमकावत होत्या. त्या झटापटीत माझ्या बोटाला चाकू लागला. मॅडम मला स्वत:कडे ओढून घेण्यास एवढ्या आक्रमक झाल्या होत्या की, मला भीती वाटू लागली. मी मॅडमचा हात पकडला. तोच चाकू घेवून तिच्याच गळ्यावर ताकदीनिशी फिरवला. धार एवढी होती की कधी त्या चाकूने आपली कामगिरी पार पाडली हेच समजले नाही. मॅडम बघता-बघता माझ्या डोळ्यासमोर रक्ताच्या थारोळ्यात निपचित झाल्या. आता मी पुरता घाबरलो होतो. मी तसाच शांतपणे बाहेर आलो. बोटाला लागल्यामुळे बोटातून रक्त येत होते, ठणकतही होते. मी खाजगी दवाखान्यात गेलो. तिथे सांगितले की सायकलच्या चेनमध्ये बोट अडकून लागले आहे. तिथे बोटावर उपचार करून घेऊन तडक विक्रांतनगर, संभाजीनगर, सातारा येथे मी रहात असलेल्या ठिकाणी आलो. तिथे मला मित्रांनी विचारले, ‘हाताला काय झाले.’ मी सांगितले की, ‘सायकलच्या चेनमध्ये अडकून लागले.’ त्यानंतर जेवलो व झोपलो. सकाळी वार्‍यासारखी बातमी पसरत माझ्या कानावर आली की कृष्णानगर येथील गजानन सोसायटीमध्ये आदित्य नगरी येथे एक वृध्द महिला मयत झाली आहे. बहुदा खून झाला असावा. मी फार घाबरलो होतो. घराच्या बाहेरही आलो नाही. घरातच बसून राहिलो.

ही माहिती पोलिसांना मिळाली. तसेच जया गणेश गायकवाड (पाटील)हिचा भाऊ दिपक रामचंद्र साळुंखे यांनी ङ्गिर्याद दिली. त्यावरून अनंत दाजीबा पेढणेकर याच्याविरूध्द सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.४६/२०२१ भा.दं.वि.स.का.क.३०२ नोंद करून त्यास अटक केली. अवघ्या चार दिवसात किचकट अशा गुन्ह्याचा तपास करून संशयितास जेरबंद करण्यात आले.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा टीम सातारा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.एम.मछले, पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हवालदार प्रशांत शेवाळे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, संदीप आवळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल धुमाळ आदी करत आहेत.

सदाशिव खटावकर

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!