पोलीस टाइम्स
कथा विज्ञान कथा / गुढ कथा

भविष्यवेध

भाग 1

डॉ. पांडुरंग पानसे…साठीला टेकलेले गृहस्थ, पण सदृढ आणि काटक. त्यांच्याकडे बघून कुणालाही वाटत नसे की त्याचं वय साठ आहे. सतत उत्साही व कामात व्यस्त. हडकुळ्या शरीराला पांढरे केस व पांढरी फे्रंचकट दाढी शोभून दिसत होती. नेहमीच चौकडयाचे शर्टस् ते वापरत असत. नामवंत शास्त्रज्ञ. टी.आय.एफ. आर मध्ये कार्यरत होते. सैध्दांतिक तसेच प्रायोगिक शास्त्रज्ञ. आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिध्दांतावर त्याचं विशेष प्रभुत्व. गेली 15-20 वर्ष ते यावर आधारीत प्रयोगांमध्ये व्यस्त. त्यातील स्थळ आणि काळाच्या पलीकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. उमेदीच्या काळात ते यावर परिश्रमपूर्वक काम करत असत. भारतात व परदेशात त्यांचं बर्‍यापैकी नाव. जनमानसात त्यांच्या नावाला वेगळंच वलय प्राप्त. म्हणून अधिकार वाणीने ते या क्षेत्रात वावरत होते.

निवृत्तीला आले तरी त्यांचा संशोधनाचा वेग कमालीचा होता. संशोधनातील काही शिखरं त्यांनी पादाक्रांत केली होती, पण काळानुसार व परिस्थितीनुसार काही संशोधनाला त्यांनी यशस्वी होऊनही तिलांजली दिली होती आणि एका वळणावर दुसर्‍या संशोधनाचा ध्यास घेतला होता. ही त्यांची खासियतच होती आणि ती ते तंतोतंत पाळत असत.

पत्नीचं नुकतेच निधन झालं होतं. एक मुलगा तोही अमेरिकेत स्थायिक होता. अधून-मधून ते त्याच्याकडे जात असत, पण बहुतांशी भारतात किंबहुना टी.आय.एफ.आरच्या आवारातच क्वाटर्समध्ये रहात असत. येथून प्रयोगशाळेत जायलाही सोयीचं होत असे. पत्नी गेल्यानंतर मात्र त्यांनी स्वतःच्या आयुष्याला एक शिस्त लावून घेतली होती. तिच्या आठवणीने ते आजही व्याकूळ होत असत. घरात सतत तिचं अस्तित्व त्यांना जाणवे. आता तिच्या नसण्याची त्यांना सवय झाली होती.

नेहमीप्रमाणे ते आज सकाळी उठले. चहा केला व हातात कप घेऊन ते बैठकीत आले. समोरचा टी.व्ही. त्यांनी चालू केला. कुठलं तरी न्यूज चॅनल आलं व त्यावर सचिन तेंडुलकरची छबी दिसली. डॉ. पांडुरंग पानसे सावधपणे सावरून बसले. चहाचा एक घोट घेतला व समोर पाहिलं. सचिन तेंडुलकरची मुलाखत एक प्रतिथयश पत्रकार घेत होता. आज त्याचा वाढदिवस होता. एकूणच त्याचा जीवनप्रवास उलगडला जात होता. डॉ. पानसेंचा सचिन तेंडुलकर हा आवडता खेळाडू असल्याने, ते लक्ष देऊन मुलाखत ऐकू लागले. त्याच्या जीवनातील एक-एक पदर पत्रकार शिताफीने प्रश्‍न विचारून उलगडू लागला. मध्यंतरात पत्रकाराने सचिनला एक प्रश्‍न विचारला.

“विश्‍वचषकातील तुझी सर्वोत्तम खेळी कुठली?”

सचिन थोडासा चुळबुळला. स्मित केलं आणि क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला,

“2002 च्या विश्‍वचषकातील उपांत्य फेरीचा पाकिस्तान बरोबरचा सामना हा माझ्या सर्वोत्तम खेळीचा भाग आहे. सर्व विश्‍वचषकातील सामन्यांपैकी ती खेळी मी उत्तम मानतो.”

2002 च्या विश्‍वचषकातील पाकिस्तान बरोबरच्या सामन्याचं नाव ऐकताच डॉ. पानसे पुनःश्‍च सावरून बसले.

“का? बरं. त्याहून इतरही काही सामने तू उत्कृष्ठ खेळला आहेस की?” पत्रकाराचा प्रश्‍न.

“निश्‍चितच! पण ती एक खास खेळी होती, कारण दोघेही संघ प्रचंड दबावाखाली होते. दोघांच्या दृष्टीने ती फायनलच होती. जिंका किंवा मरा हाच त्यांचा हेतू होता.” सचिननं सांगितलं.

“त्यावेळी तू चांगलीच खेळी केलीस! त्याबद्दल शंका नाही, पण मला आजही आठवतंय. तिसर्‍या ओव्हर मधला चौथा चेंडू तू शिताफीने खेळून थर्ड मॅनला पाठवल्यानंतरसुध्दा तू धाव घेतली नाहीस. गांगुलीला तू तुझ्या क्रिझमधून परत पाठवलं. असे का? आजही हे क्रिकेट रसिकांना कळलेलं नाही.” पत्रकारानं मुद्यालाच हात घातला.

डॉ. पानसेंचा चहा पिऊन झाला होता. त्यांनी कप अलगदपणे टीपॉयवर ठेवला. ते सचिन काय म्हणतोय याकडे लक्ष देऊन ऐकू लागले. ते थोडे अस्वस्थही झाले.

सचिन थोडा वेळ चुळबुळला व विचार करत म्हणाला,

“मला माहित नाही, पण मी तसा वागलो. तो क्षण माझ्या हातातून निसटला असता किंवा मी क्रिझ सोडली असती तर तो सामना आम्ही कदाचित हरलो असतो. कदाचित विज्ञानावरती माझी ही निष्ठा असावी. यापेक्षा त्या क्षणाचं व प्रसंगाचं जास्त विवेचन मला देता येणार नाही.”

सचिनच्या उत्तरानं डॉ. पानसे खुष झाले. त्यांनी दीर्घ श्‍वास सोडला. ते पाठीमागे रेलून बसले. समोर सचिनची मुलाखत चालूच होती, पण यावेळी त्यांचं लक्ष त्याकडे नव्हतं. ते पंधरा वर्षापूर्वीच्या प्रसंगाकडे ओढले गेले. भूतकाळात जातांना त्यांना तो प्रसंग व ते वातावरण जसंच्या तसं आठवू लागले. त्यांनी हळूवार डोळे मिटले व चित्र मनःचक्षुवर उभारलं जाऊ लागलं.

डॉ. पानसेंच्या संशोधनाचा तो उमेदीचा काळ होता. त्याचं सैध्दांतिक सोबतच प्रायोगिक प्रभुत्व सिध्द झालं होते. एका मोठ्याच संशोधनाला त्यांनी हात घातला होता. टाईम मशिननं त्यांना झपाटलं होतं आणि आईन्स्टाईनच्या शास्त्रीय आधारानं त्यांनी तो प्रकल्प उभारला होता. प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावणारी यंत्रणा त्यांनी तयार केली होती. टी.आय.एफ.आर संस्थेच्या एका भुयारी प्रयोगशाळेत त्यांनी ही यंत्रणा उभी केली होती. प्रयोगशाळेचा मोठा व्याप व परिसर होता.

2002 विश्‍वचषकातील पाकिस्तान सोबतच्या उपांत्य सामन्याच्या आदल्या रात्रीचं डॉ. पानसेची यंत्रणा चाचणीसाठी सज्ज होती. उद्या होणार्‍या पाकिस्तान व भारताच्या सामन्याचा ज्वर आदल्या रात्री पासूनच भारतात चढू लागला होता. चर्चा होऊ लागल्या होत्या. संभाव्य विजेत्यांची दखल घेतली जाऊ लागली. भारताची मदार तेंडुलकरवरच होती आणि त्याचीच विकेट घेण्याचा घाट पाकिस्तानच्या संघात घातला जात होता. सचिनला आऊट केलं की सामना पूर्ण फिरणार ही पाकिस्तानचा कर्णधार अक्रमला कल्पना होती, म्हणून ते सर्व डावपेच आखू लागले. उद्याच्या सामन्याची उत्सुकता लहान मुलांपासून थोरांपर्यत होती. उद्याची प्रत्येकाची योजना ठरलेली होती. बहुतांशी लोकांनी सुट्टीच टाकली होती. सामन्याचा मनमुराद आनंद लुटण्याची प्रत्येकाचीच योजना होती. अधिकारी व मंत्र्यांपर्यंतही या सामन्याचीच चर्चा होती. भारताच्या दृष्टिने ही अंतिम लढत होती. प्रत्येक भारतीयांच्या मनाचा ठाव घेणारा हा सामना होता आणि त्याला डॉ. पानसेही अपवाद नव्हते. ते स्वतः क्रिकेटप्रेमी व वेडे असल्याने या सामन्याची उत्सुकता त्यांना होती, पण त्याआधी त्यांना त्यांच्या यंत्रणेची चाचणी घ्यायची होती, म्हणजे उद्याचा सामना पहायला ते मोकळे रहाणार होते. त्यावेळी कुठलंही काम त्यांना करायचं नव्हतं.

डोक्यात काही विचार घेऊनच डॉ. पानसे प्रयोगशाळेत आले होते. रात्री 12 नंतरची वेळ होती. काही संशोधक विद्यार्थी हॉस्टेलला निघून गेले होते, तरी डॉ. पानसे एकटेच होते आणि त्यांना एकट्यांनाच व रात्रीच महत्त्वाचे प्रयोग करायला आवडत असे. महत्त्वाच्या प्रयोगांसाठी ते रात्रीची वेळच निवडत असत. त्यांच्या टाईम मशिन यंत्रणेची चाचणी त्यांना अडथळ्याविनाच करायची होती, म्हणून त्यांनी रात्रीची वेळ निवडली होती.

रात्रीचे बारा वाजले होते. डॉ. पानसेंनी तळघरातील प्रयोगशाळेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या व्यतिरिक्त तिथं कुणीच नव्हतं. प्रयोगशाळा वातानुकुलित असल्याने वातावरण थंड होतं. एका काच तावदानातून ते आत शिरले. तेथे मोठ्या यंत्रणा, उपकरणे व तारांची प्रचंड जंजाळी होती. एका नियंत्रण टेबलावर ते आले. तेथे त्यांनी काही बटणं चालू केली. तारांच्या महाजंजाळात तिथे एक फायबरची खुर्ची होती. तिलाही असंख्य केबल्स जोडलेल्या होत्या. डॉ. पानसेंनी निरीक्षण करून घेतलं. खुर्चीवर बसून पाहिलं. एक वेगळीच अनुभूती त्यांना जाणवली. बरीच उपकरणं चालूच असल्याने घर्रऽऽ घर्रऽऽ आवाज येत होता. वातावरण अतिशय शांत होतं. डॉ. पानसे खुर्चीतून उठले व नियंत्रण कक्षात आले. त्यांना आज या यंत्रणेची चाचणी घ्यायचीच होती. ते ठरवूनच आले आणि स्वतःलाच ते अनुभवायचं होतं. त्यांनी पॅनलवरची काही बटनं दाबली व एक पाच मिनिटांच्या कालावधी त्यावर स्थिर केला आणि ते हळूच खुर्चीकडे जाऊ लागले. त्यावर ते बसले. सभोवार एकदा पाहून घेतलं. यावेळी कुठलाही अडथळा येणार नाही याची खात्री करून घेतली. खुर्चीवर स्वतःला त्यांनी सुरक्षा पट्ट्यानं बांधून घेतलं. डावीकडे असणारी हिरवी कळ त्यांनी दाबली आणि खुर्ची स्वतःभोवती फिरायला सुरूवात झाली. हळूहळू करत तिचा वेग वाढला. पुढे क्षणात खुर्चीचा वेग एवढा वाढला की खुर्ची व डॉ. पानसे दिसेनासे झाले. तेथे प्रकाश शलाका चमकू लागल्या आणि पुढची पाच मिनिटे तेथे कुणाचंच अस्तित्व नव्हतं. पाच मिनिटांच्या कालावधीनंतर मात्र खुर्ची पुनःश्‍च दृश्य स्वरूपात दिसू लागली आणि डॉ. पानसेंचं धुसर व्यक्तिमत्त्वही हळूहळू ठळक होत गेलं. खुर्ची स्थिर होताच डॉ. पानसेही थोड्या वेळ तसेच बसून राहिले.

हळूच त्यांनी बेल्ट सोडला व उठले. त्यांना या पाच मिनिटातील पुढील भविष्य दिसलं होतं आणि ते चांगलेच थरारले होते. भविष्याचा कालावधी कमी असला तरी तो त्यांना दिसला होता. त्यांची टाईम मशिनची यंत्रणा यशस्वी झाली होती. याचं सुख व आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसतच होता, पण या कालावधीत त्यांनी पुढील काही काळाचं भविष्य पाहिलं होतं. त्यानं ते हवालदिल झाले होते. उद्याचा भारत-पाकिस्तान सामन्याचं पुढील भविष्यच ते पाहून आले होते. त्यानं ते चांगलेच हादरलेे. पाकिस्तानने पहिली बॅटींग करतांना धावांचा डोंगर उभा केला होता. 340 रनांचं टार्गेट होतं. सर्व मदार सचिनवरच होती आणि ओपनिंग म्हणून गांगुली आणि तेंडुलकर खेळायला आले होते, परंतु अक्रमच्या तिसर्‍या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर हल्ला चढवत तेंडुलकरने तो थर्ड मॅनला पाठवला होता आणि गांगुली-तेंडुलकर धाव घ्यायला पळाले. दुसरी धाव घेतांना मात्र अतिशय सुक्ष्म अंतराने तेंडुलकर रनआऊट झाल्याचं दृश्य डॉ. पानसेंना दिसले होते.   

Leave a Comment