पोलीस टाइम्स
अहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर ठाणे पालघर पुणे बीड महाराष्ट्र मुंबई उपनगर मुंबई शहर लातूर सातारा सोलापूर हेडलाइन

विनायकच्या हत्येमागे नेमके कोणते कारण आर्थिक वाद की बांधकाम नियमांचे पालन?

पुण्यातील वारजे, माळवाडी येथे रहाणारे सुधाकर शिरसाट हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  या राजकीय पक्षाचे बांधकाम कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष म्हणून काम पहातात, तर विनायक शिरसाट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बांधकाम कामगार सेनेचे शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याबरोबर ते एक सक्रीय आरटीआय कार्यकर्ते म्हणून लोकांमध्ये परिचित होते. त्यांनी नर्‍हे, भुगाव, आंबेगाव, शिवणे, जांभुळवाडी, उत्तमनगर, कोंढवे, धावडे या परिसरातील अनेक नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेले अनधिकृत इमारती माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवून अनधिकृत असल्याचे उघड करून पीएमडीआरए व पुणे महानगरपालिकेला जमीनदोस्त करण्यास भाग पाडले होते. जवळपास बहात्तर अनधिकृत इमारती विनायक शिरसाट यांनी जमीनदोस्त करवल्या होत्या व इतर अनेक अनधिकृत बांधकामाबाबत त्याचा पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या अनधिकृत बांधकामाविरूद्धच्या मोहिमेमुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांचे कोटीचे आर्थिक नुकसान झाले होते, तसेच समाजात मानखंडणाही झाली होती, त्यामुळे या परिसरातील बिल्डर लॉबी विनायक शिरसाट यांच्यावर चिडून होती. याबद्दल काही बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांना धमकीचे फोनही यायचे. या धमक्याबाबत त्यांनी अनेकदा घरात सांगितले होते. दि. 30 जानेवारी 2019 रोजी ते सकाळी घरातून बाहेर पडले. ते ‘दुपारी जेवायला येतो घरी परत’ बोलले, पण ते संध्याकाळ झाली तरी परतले नाहीत व त्यांच्या चालकाला आलेल्या फोनमुळे शिरसाट कुटुंबीय चिंताक्रांत झाले.  त्यामुळे विनायकचे अपहरण झाल्याची तक्रार देण्यासाठी शिरसाट कुटुंबीय भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गेले, परंतु पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल न करता मनुष्य मिसींगची तक्रार नं. 21/2019 दाखल केली. विनायकचे कुुटुंबीय विनायकचा सर्वत्र शोध घेत असतांना त्यांना विनायकची पेजोरो कार आंबेगाव खुर्द भागात रस्त्याच्या कडेला लावलेली आढळून आली. विनायकचा शोध घेत असतांना विनायक त्याचा मित्र धरमप्रकाश कतीराम वर्मा (वय 38) रा. रिव्हर व्ह्यू सोसायटी शिवणे याला व त्याच्या दोन कामगारांबरोबर जातांना पाहिल्याची माहिती कुुटुंबीयांना मिळाली. पोलीस विनायक शिरसाट यांचा शोध गांभीर्याने घेत नव्हते, कारण पोलिसांनी केवळ मनुष्य मिसींगची तक्रार दाखल केली होती, परंतु शिरसाट कुटुंबीय विनायक शिरसाट यांचे अपहरण करण्यात आले आहे अशी तक्रार पोलिसांना घेण्यास सांगत होते व अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केल्यामुळे व इतरही अनधिकृत बांधकामाबाबत त्यांचा पाठपुरावा चालू होता, त्यामुळेच बांधकाम व्यावसायिक त्यांना धमकावत होते, त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या लॉबीनेच आपल्या मुलाचे अपहरण केले आहे व या कामात धरमप्रकाश वर्मा याचा हात असल्याचा संशय सुधाकर शिरसाट व्यक्त करत होते, पण याकडे पोलिसांनी म्हणावे तितके गांभीर्याने लक्ष दिले नाही, तेंव्हा शिरसाट कुटुंबीयांच्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे अनेक कार्यकर्ते उभे राहिले व त्यांनी आंदोलन करत पोलीस आयुक्तांची दि. 5 फेब्रुवारी 2019 रोजी भेट घेतली व निवेदन दिले. तसे पोलिसांनी दि. 5 फेब्रुवारी 2019 रोजी गुन्हा रजि.नं. 131/2019 भा.दं.वि. कलम 363 अन्वये विनायक शिरसाट यांचे अज्ञाताने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला व धरमप्रकाश वर्मा याच्याकडे चौकशी केली, पण त्याच्याकडून विनायकबाबत काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही, त्यामुळे त्याला चौकशी करून सोडून देण्यात आले. धरमप्रकाश वर्मा हादेखील पीओपीची कामे करत होता. सात-आठ वर्षापासून त्यांचे मैत्रीपूर्ण व्यावसायिक संबंध होते. विनायक शिरसाट यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पौड येथील मुठा गाव दर्शवत होते. यावरून भारती विद्यापीठ पोलीस व पौड पोलीस विनायक शिरसाट यांचा शोध घेत होते. दरम्यान मुठा गावाजवळील दरीतून खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी दरीत शोध घेतला असता कुजलेल्या अवस्थेतील एक पुरूष जातीचा मृतदेह मिळून आला. मृतदेहावरील कपडे व  इतर चीजवस्तूवरून तो मृतदेह विनायक शिरसाट यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. विनायक शिरसाट यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आल्याचे दिसून येत होते. इन्क्वेस्ट पंचनामा आदी बाबी पूर्ण करून विनायक शिरसाट यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरता ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला. या प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट 3 हे समांतर तपास करत होते, तेंव्हा युनिट 3 च्या सहाय्यक फौजदार किशोर शिंदे व हवालदार मेहबूब मोकाशी यांना खात्रीशीर माहिती मिळाली की मुक्तारअली मसीहुद्दीन अली (वय 34) रा. लिपाणे वस्ती, निलम बिल्डींग आंबेगाव, मूळ रा. खजराणा इंदोर, राज्य मध्यप्रदेश व महमद फारूख इसहाक खान (वय 28) रा. उत्तमनगर पोलीस चौकी, पाठीमागे, उत्तमनगर, मूळ रा. इनुडी पो. अमोवाबास थाना गैसडी, जि. बलरामपूर, राज्य उत्तरप्रदेश यांचा विनायक शिरसाट यांचे अपहरण करून खून करण्यात सहभाग आहे. त्यावरून त्यांना तेलंगणा राज्यातील मेहबुबाबाद येथून युनिट 3 च्या पोलिसांनी ताब्यात घेतले, तेंव्हा त्यांनी आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली व या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार धरमप्रकाश वर्मा असल्याचे सांगितले. धरमप्रकाश वर्मा याला मूळगावाहून पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने आपला गुन्हा कबुल केला व विनायक शिरसाट याचा खून आर्थिक वादातून केला असल्याचे सांगितले. सात-आठ महिन्यापासून विनायककडून सुमारे वीस लाख रूपये धरमप्रकाशला येणे होते. ते पैसे देण्यास विनायक टाळाटाळ करत होता. यावरून जानेवारी 2019 च्या शेवटच्या आठवड्यात धरमप्रकाश व विनायक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, तेंव्हा विनायक शिरसाट याने धरमप्रकाशला त्याच्या पत्नी व मुलीवरून अश्‍लिल शब्द वापरले. याचा राग त्याच्या डोक्यात गेला व त्याने विनायकचा खून करण्याचा कट आखला. या कामात त्याने मुक्तारअली व महमद खान यांची मदत घेतली.

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!