पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र हेडलाइन

करणी केल्याच्या संशयाने निखिलने काढली तलवार! आझाद यांना करून ठार, त्यांच्या सूनांवर केले वार!

कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील टेंबलाईवाडी नाका येथील रेल्वे फाटक गेट नं.2 याठिकाणी आझाद मकबूल मुलतानी हे 56 वर्षाचे गृहस्थ आपली पत्नी, दोन मुले, दोन सूना आणि नातवंडांसोबत रहातात. ते सेंट्रींग कामगार आहेत. त्यांची मुलेही कामाला जातात. त्यांच्या घराशेजारीच निखिल पिंटू उर्फ रविंद्र गवळी हा 21 वर्षाचा तरूण आई-वडील, बहीणींसोबत रहातो. निखिल गवळी याच्याकडे छोटा टेम्पो आहे. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत येथील मालाची ने-आण करण्यासाठी तो हा टेम्पो वापरतो. दिवसभर कष्टाचे काम केल्यानंतर शिणवटा घालवण्यासाठी त्याने दारू प्यायला सुरूवात केली होती, पण हळूहळू त्याला दारूचे व्यसनच लागले. नशा करूनच तो संध्याकाळी घरी यायचा आणि येतांना समोर कोणी दिसेल त्याला शिवीगाळ करायचा. त्याच्या या शिवीगाळीला सारे जण वैतागले होते. तो संध्याकाळी शिवीगाळ करत घराकडे येवू लागला की परिसरातील लोक आपल्या घराचे दरवाजे बंद करून घेत असत.

शेजारचे मुलतानी कुटुंबाचा भांडण सोडवण्यासाठी पुढाकार!

घरातही त्याचा हा त्रास त्याच्या आई-वडीलांना होत असे. काहीही कारण नसतांना तो आई-वडीलांशी भांडत असे. अशावेळी शेजारी रहाणारे मुलतानी कुुटुंब मध्ये पडून त्यांचे हे भांडण सोडवत असे. निखिलची समजूत काढत असे, पण निखिलला ते आवडत नसे. तो नेहमी म्हणत असे, ‘तुम्ही आमच्या घरगुती भांडणात मध्ये का पडता?’

मुलतानी कुटुंब करणी करत असल्याचा संशय

निखिल हा दिवसभर काम करून तो पैसे मिळवत असे, पण संध्याकाळ झाली की पहिल्यांदा दारूवर पैसे खर्च करून उरलेले पैसे घरी देत असे. त्यामुळे ते पैसे अपुरे पडत असत, पण ही बाब त्याला समजून येत नसे. त्याला वाटत असे की शेजारचे मुलतानी कुटुंब हे आपल्यावर करणी करत असेल, त्यामुळेच आपल्या घरची स्थिती सुधारत नाही. या कारणामुळेही निखिल हा मुलतानी कुटुंबावर चिडून होता. ‘तुम्हाला मी एके दिवशी बघूनच घेतो.’ असे तो मुलतानी कुटुंबाला म्हणत असे. त्याचे आई-वडीलांबरोबर चाललेले भांडण सोडवायला आल्यावर तर तो जास्तच धमकी देत असे. एके दिवशी निखिल याने हायवेवर जावून खंजीर, चाकू अशी हत्यारे विकणार्‍या लोकांकडून एक तलवार विकत घेतली आणि ती कापडात गुंडाळून घरी आणून ठेवली.

खानपान चालू असतांनाच केला हल्ला!

मंगळवार दि. 16 मे 2023 चा दिवस. नेहमीप्रमाणे सकाळी उठून निखिल हा आपला टेम्पो घेवून कामासाठी बाहेर पडला. दिवसभर त्याने काम केले, पण त्यादिवशी कोणतेही काम त्याच्या मनासारखे झाले नसल्यामुळे तो नाराज होता, मनातून चिडलेला होता. संध्याकाळी दारू पिऊनच तो घरी पोहोचला. रात्रीचे साडेआठ वाजले होते. घरात गरम होत असल्याने आझाद मुुलतानी यांची दोन मुले बाहेर फिरायला गेली. त्यानंतर आझाद मुलतानी, त्यांची पत्नी आणि सूना जेवायला बसल्या. त्यातील आझाद मुलतानी यांची थोरली सून ही दरवाजाकडे पाठ करून जेवायला बसली असल्यामुळे निखिलला वाटले आता घरात सर्व जण आहेत. हीच संधी आहे त्यांना मारण्याची असे मनातल्या मनात म्हणत तो आपल्या घरात गेला. कापडामध्ये गुंडाळलेली तलवार बाहेर काढून तो मुलतानी यांच्या घरात शिरला. सुरूवातीला त्याने दरवाजाकडे पाठ करून जेवत बसलेल्या अफसाना हिच्या पाठीत तलवारीने वार केला. तो वार होताच ती मोठ्याने किंचाळली. तिच्या आवाजाकडे दुसर्‍या सूनेचे लक्ष जाताच ती जावेला वाचवायला आली असता तिच्या मानेवरही त्याने वार केला, तिने तो वार चुकवला, पण या वारामुळे तिच्या डोक्यावरचे केस तुटून खाली पडले. आपल्या दोन्ही सूनांवर वार होत असलेले पहाताच जेवत बसलेले आझाद मुलतानी समोर आले, तेंव्हा निखिल त्यांना म्हणाला, “आमच्या घरावर जादूटोणा करता काय? आमच्या घरात भांडणे सुरू असतांना तुम्ही लोक सोडवण्यास का येता? तुम्हाला आता मी सोडत नाही. ठारच मारून टाकतो.” असे म्हणत निखिलने आझाद  यांच्या डोक्यावर, पाठीत, हातावर व मांडीवर तलवारीने सपासप आठ ते दहा वार केले. एकच आरडाओरडा सुरू झाला. लोक जमा होऊ लागले. तशी रक्ताने माखलेली तलवार घेवून निखिल पळाला.

पोलीस ठाण्यात हजर!

कांड केल्यानंतर निखिल घटनास्थळावरून पळून गेला. वाटेतच त्याने अंधारामध्े एका मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावरील झुडुपात तलवार टाकली आणि तो राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याचे कपडे रक्ताने माखलेले पोलिसांनी पाहिले. याने नक्कीच मोठे कांड केलं आहे असे म्हणत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ‘नेमकं काय केलंस तू’ असे म्हणत पोलिसांनी चौकशी केली, तेंव्हा त्याने पोलिसांना सगळी हकीकत सांगितली. प्रकरण गंभीर असल्याने त्याला घेऊन पोलीस पथक तातडीने घटनास्थळावर पोहचले.

मुलतानी यांच्या घरातील परिस्थिती अत्यंत भयानक होती. घरातील लोक जेवण करतांनाच हे हत्याकांड घडले होते. जेवणाच्या ताटात, भांड्यामध्ये रक्ताचा सडा पडला होता. सारी ताटे, भांडी विखरून पडली होती. घरामध्ये आझाद मुलतानी यांचा मृतदेह पडला होता. त्याचा पंचनामा करून घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान या घटनेतील दोन्ही जखमी सूनांना त्यांच्या भाच्यांनी सीपीआरमध्ये दाखल केले होते. पोलिसांनी निखिलला हत्यारासंदर्भात विचारले असता त्याने झुडुपात टाकून दिलेली तलवार काढून दिली. तसेच त्याचे रक्ताने माखलेले कपडेही ताब्यात घेतले.

निखिल याची परिसरात दहशत!

या घटनेसंदर्भात परिसरात चौकशी केली असता परिसरामध्ये निखिल याची दहशत असल्याचे समजून आले. तो दारू पिवून आल्यानंतर दिसेल त्याला शिवीगाळ करत असे. तसेच आई-वडीलांशीही भांडण काढत असे, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला सारे जण घाबरून होते. या घटनेनंतर निखिलचे आई-वडील आणि बहीणी यांनी पळ काढल्याचे समजून आले. परिसरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून राजारामपुरी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली.

गुन्हा नोंद

राजारामपुरी पोलिसांनी संशयित निखिल पिंटू उर्फ रविंद्र गवळी याच्याविरोधात गुन्हा रजि. नं. 282 /2023 भा.दं.वि. कलम 302, 307, 452, 504 सह भारतीय हत्यार कायदा कलम 5, 27 प्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे यांनी भेट दिली.

तपास पथक

घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मानसिंग राजपूत, हवालदार अमित सर्जे, एकनाथ कळंत्रे, पोलीस नाईक अरविंद पाटील हे करत आहेत.

Leave a Comment